अन्न व औषधी प्रशासन ढाराढूर : पुणे गुन्हे शाखेकडून मात्र शहरात कारवाई!
शहरातील गुटखाकिंगला अभय कुणाचे? पानटपर्यांवर खुलेआम मिळतो गुटखा
पिंपरी-चिंचवड : पुणे गुन्हे शाखेच्या पथकाने निगडी आणि चाकणजवळ कोट्यवधींचा गुटखा पकडून अन्न व औषधी प्रशासनाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले होते. तसेच, या विभागाकडून ‘गुटखाकिंग’ असलेल्यांना कसे अभय दिले जात आहे, ही बाबही चव्हाट्यावर आली होती. गुटखाविक्रीच्या गोरखधंद्यात पिंपरी-चिंचवड शहरात कोट्यवधीची काळीमाया जमा होत असून, त्यामुळे अन्न व औषधी प्रशासन विभाग संशयाच्या भोवर्यात सापडला आहे. पोलिसांनी गत आठवड्यात चाकण व निगडी येथे कारवाई केली असली तरी, गुटखाविक्रीच्या रॅकेटचे खरे सूत्रधार मात्र अद्यापही अटकेपासून दूर आहेत. पोलिस अशाप्रकारे कारवाई करत असताना ‘एफअॅण्डडी‘चे अधिकारी डोळ्यावर कातडे ओढून का शांत बसलेत? असाही प्रश्न आता निर्माण होत आहे. शहराच्या शेवटच्या टोकाच्या गुन्हे शाखेने पिंपरी-चिंचवडमध्ये येऊन कारवाई केली. यापूर्वीही पोलिसांकडूनच गुटखाविक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली तर अपुर्या मनुष्यबळामुळे आम्ही गुटखाविक्रेत्यांवर कारवाई कऱण्यास असमर्थ असल्याचे अन्न व औषधी प्रशासन विभागाकडून बेजबाबदारपणे उत्तर देण्यात येत आहे.
चाकण, पिंपरी कॅम्प, चर्होलीत गुटख्याची गोदामे?
राज्य सरकारने गुटखा व सुगंधीत सुपारीच्या विक्रीवर राज्यात बंदी घातली आहे. त्यामुळे सुरुवातीला गुटखा मिळणे दुरापास्त झाले. मात्र, राज्यातील गुटखाशौकीनांची संख्या पाहता, गुटख्याच्या काळ्या बाजाराला पोषक वातावरण निर्माण झाल्याने छोट्या पानटपर्यांवर गुटखा सहजपणे उपलब्ध होत आहे. दहा रुपयांची गुटखा पुडी 75 रुपयांना उपलब्ध होत असून, या टपर्यांना गुटखा पुरविण्यासाठी वेगळी यंत्रणा कार्यरत आहे. ठराविक पानटपर्यांना गुटखा बॉक्स उपलब्ध करुन दिले जातात. या टपर्यांवरुनही खात्रीलायक आणि ओळखीच्या ग्राहकांना चढ्या भावानेच या पुडीची विक्री केली जाते. शहरात येणारा हा गुटखा परराज्यातून येत असून, त्यासाठी चाकणसह, पिंपरी कॅम्प, चर्होली अशा ठिकाणी गोदामे उभारण्यात आल्याची माहिती विश्वासनीय सूत्राने दिली आहे. खरे तर या गोदामे व गुटखाविक्रीच्या रॅकेटची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला असते, मात्र याकडे साफ दुर्लक्ष केले जात आहे.
अवैध गुटखाविक्रीला राजकीय अभय!
चाकणमध्ये नुकतीच पावणेदोन कोटी रुपयांचा गुटखा पकडण्यात आला. त्यावरून शहरामध्ये गुटखा कितीमोठ्या प्रमाणात विकला जातो हे समजते. आतापर्यंतच्या गुटख्यावरील कारवाई पोलिसांकडून केल्या जातात, मात्र अन्न औषध प्रशासन विभागाने मोठी कामगिरी बजावल्याचे कौतुक केले जाते. राजकीय वरदहस्त असल्यामुळे शहरामध्ये गुटखाविक्री जोमात असल्याचे बोलले जात असून, प्रत्येक प्रभागामध्ये अवैध गुटखाविक्रीची स्थानिक नगरसेवक, पोलिस व अन्न औषध प्रशासन विभागाला माहिती असते. मात्र अन्न व औषध प्रशासन विभाग हेतुपुरस्सर दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. आळंदी परिसरातून गुटखा रॅकेट चालविले जात असल्याचे अनेकदा निदर्शनास आले आहे. चाकण पोलिसांच्या हद्दीत केलेल्या कारवाईतील आरोपी या गुटखाकिंगशी संबंधित आहेत. मात्र, राजकीय वरदहस्त असल्याने त्याच्यावर कारवाई होत नाही. त्याच्यापुढे पोलिस व अन्न औषध प्रशासन हतबल असल्याची चर्चा आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील गुटखाविक्रीवर कारवाई कऱण्यासाठी फक्त सहा लोक आहेत तर पुण्यासाठी 25 लोक आहेत. अन्न व औषध प्रशासन विभागाकडे गुटख्यावरील कारवाईशिवाय अन्नपदार्थ दर्जा, परवाना देणे, नोंदणी याशिवाय नोंदणी नसल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याची कामे आहेत. गुटख्याच्या संदर्भात बाहेरून जेव्हा माहिती मिळते तेव्हा चौकशी करून कारवाई केली जाते. मात्र फक्त गुटखाविक्रीवरच लक्ष केंद्रीत न करता इतरही कामे करावी लागतात.
– संजय नारागुडे
सहाय्यक आयुक्त अन्न व औषधी प्रशासन