पिंपरी-चिंचवड : शहराला 2 मे पासून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे, अशी माहिती महापौर नितीन काळजे यांनी दिली.
पाणी कपातीचा निर्णय घेण्याबाबत आज (मंगळवारी) महापालिकेत गटनेत्यांची बैठक झाली. बैठकीला सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते योगेश बहल, शिवसेनेचे गटनेते राहूल कलाटे, मनसेचे गटनेते सचिन चिखले उपस्थित होते. पिंपरी-चिंचवड शहराला पवना धरणातून पाणीपुरवठा होतो. पवना धरणात आजमितीला 38.37 टक्के पाणीसाठा आहे. 98 दिवस म्हणजेच 31 जुलैपर्यंत हे पाणी पुरु शकते. हा पाणीसाठा मुबलक असला तरीही पाण्याचा वापर काटकसरीने करणे गरजेचे आहे. पावसाने ओढ दिल्यावर पाणीटंचाईचे संकट येऊ नये म्हणून 2 मे पासून पाणी कपात करण्याचा निर्णय घेतल्याचे, महापौर काळजे यांनी सांगितले.
गेल्यावर्षी चांगला पाऊस पडल्यामुळे यंदा एप्रिलमध्येही धरणात मुबलक पाणीसाठा आहे. पवना धरणात आजमितीला 38.37 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्यावर्षी याच तारखेला 26.65 टक्के पाणीसाठा होता. गेल्यावर्षीपेक्षा पाणीसाठा मुबलक असला तरीही पाण्याचा वापर काटकसरीने करणे गरजेचे आहे. पावसाने ओढ दिल्यावर पाणी टंचाईची वेळ येऊ नये, यासाठी पाणी कपातीचा निर्णय घेतल्याचे, महापौर काळजे यांनी सांगितले. शहरातील नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहनही, त्यांनी केले आहे.