पिंपरी चिंचवड : शहर भाजपामध्ये जुन्या कार्यकर्त्यांमधील नाराजी दूर करण्यासाठी भाजपाचे शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप यांनी पुढाकार घेतल्याचे दिसून येत आहे. प्रकाश जवळकर आणि महादेव कवितके या दोन जुन्या कार्यकर्त्यांची थेट जिल्हा सरचिटणीसपदी वर्णी लावून योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
हे देखील वाचा
या निर्णयामुळे जुन्या कार्यकर्त्यामधील दोन कार्यकर्ते थेट कोअर कमिटीत दाखल होणार आहेत. या निर्णयाने जुन्या कार्यकर्त्यांच्या गोटात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचबरोबर जुन्या कार्यकर्त्या संजीवनी पांडे यांची देखील मुद्रा लोन योजनेच्या अशासकीय पदी नियुक्ती झाली आहे. या सगळ्यांमुळे जुन्या कार्यकर्त्यांना सुध्दा अच्छे दिन येण्यास सुरुवात झाली आहे. ओल्ड इज गोल्ड च्या माध्यमातून उभ्या केलेल्या लढ्यास नगरसेवक मोरेश्वर शेडगे, भिमा बोबडे, दिपक कुलकर्णी, शेखर लांडगे, अजय पाताडे, रघुनंदन घुले, दिलीप गोसावी आदी 300 कार्यकर्त्यांच्या सहकार्याच्या भुमिकेमुळेचे हे यश मिळाल्याची प्रतिक्रिया माजी नगरसेवक राजू दुर्गे यांनी दिली आहे. त्याचबरोबर, या पुढेही महामंडळ अथवा जिल्हा कमिट्यामध्ये देखील जुन्या कार्यकर्त्यांना न्याय मिळेल, अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे. या निर्णयाचे स्वागत करतांना त्यांनी याचे श्रेय शहर अध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, पालकमंत्री गिरीष बापट व प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांना देऊन या सर्व नेत्यांचे आभार देखील मानले.