पिंपरी ते निगडी मेट्रो मार्गाच्या अहवालाला मंजूरी

0
पिंपरी चिंचवड : महापालिकेने पिंपरी ते निगडीपर्यंत मेट्रो मार्ग करण्यासाठी तयार केलेल्या 1 हजार 48 कोटी 22 लाखांच्या प्रकल्प अहवालाला सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. राज्य आणि केंद्र शासनाच्या मंजुरीनंतर या मेट्रो मार्गाच्या प्रत्यक्ष कामाला सुरूवात होणार आहे. या मार्गाचे भूमीपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात यावे, अशी मागणी नगरसेविका सीमा सावळे यांनी केली आहे. महापौर राहूल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभेत गुरूवारी (दि. 20) मेट्रोच्या पिंपरी ते निगडीपर्यंतच्या विकास आराखड्याचे सादरीकरण सभागृहात करण्यात आले.
सभागृहाची अंतिम मान्यता…
मेट्रो प्रकल्पाचा मार्ग, सेवा वाहिन्यांचे स्थलांतर आणि भूसंपादनापोटी 1 हजार 48 कोटी 22 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. त्याबाबतचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून तो स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. समितीने 11 डिसेंबर 2018 रोजीच्या सभेत या अहवालाला मंजुरी दिली होती. स्थायी समितीने मंजूर केलेला अहवाल सर्वसाधारण सभेपुढे अंतिम मान्यतेसाठी ठेवण्यात आला होता.
संगणकीय सादरीकरण…
प्रशासनाच्या वतीने पिंपरी ते निगडी मेट्रो मार्गाचे सभागृहात संगणकीय सादरीकरण केले. त्यानंतर या मार्गाच्या अहवालाला सभागृहात एकमताने मंजुरी देण्यात आली. राज्य सरकारकडे हा अहवाल मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. राज्य सरकारने मंजुरी दिल्यानंतर अहवालाला केंद्राची मंजुरी घेण्यात येणार आहे. त्यानंतरच पिंपरी ते निगडी मेट्रो मार्गाच्या कामाला प्रत्यक्ष सुरूवात होईल.