पिंपरी ते निगडी मेट्रो मार्गाला राज्य शासनाची मंजुरी

0

पिंपरी- पुणे मेट्रो पहिल्या टप्प्यात निगडी पर्यंत पोहोचण्यासाठी राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. महाराष्ट्र मेट्रो कडून सविस्तर प्रकल्प अहवाल सादर केल्यानंतर डिसेंबर 2018 मध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेने मंजुरी दिली. त्यानंतर हा अहवाल राज्य शासनाच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. त्याला बुधवारी 27 रोजी राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे पुणे मेट्रो पहिल्या टप्प्यात निगडी पर्यंत पोहोचण्याचा आणखी एक मार्ग मोकळा झाला असून आता केवळ केंद्र सरकारच्या परवानगीची गरज आहे. यासाठी 1 हजार 48.22 कोटी रुपये खर्च होणार आहे. पिंपरी ते निगडी मेट्रो मार्गाची लांबी 4.413 किलो मिटर आहे. यादरम्यान चिंचवड, आकुर्डी, निगडी हे तीन स्थानके येणार आहे.

सध्या महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड कॉरिडोर एक म्हणजेच पीसीएमसी ते स्वारगेट (16.598 किमी) मेट्रो मार्गिकेचे बांधकाम करीत आहे. त्यापैकी पीसीएमसी पासून रेंजहिल पर्यंत डिसेंबर 2019 पर्यंत मेट्रो कार्यान्वित करण्यात येणार असून रेंजहिल ते स्वारगेट नोव्हेंबर 2021 पर्यंत कार्यान्वित करण्याचा मानस आहे. पीसीएमसी ते निगडी या मार्गाच्या विस्तारासाठी सर्वसामान्य नागरीक, शहरातील सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी, तसेच इतर भागधारांकडून मागण्या करण्यात आल्या होत्या. निगडी (भक्ती शक्ती चौक) थेट स्वारगेट, मंडई, फडके हौद, शिवाजी नगर, सिविल कोर्ट या भागांशी जोडला जाईल. मेट्रोची पूर्व – पश्‍चिम मार्गिका जी पीसीएमसी ते स्वारगेट अशी बन विण्यात येत आहे, आता या विस्तारामुळे पुणे पिंपरी चिंचवड महानगरच्या पश्‍चिमेकडील दाट वस्ती असलेल्या सर्व भागांना जोडण्याचे काम होईल.