बार असोसिएशन व विधी सेवा प्राधिकरणाच्या संयुक्त विद्यमाने आयोजन
तज्ज्ञ मान्यवरांकडून विविध विषयांवर मार्गदर्शन
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड अॅडव्होकेट बार असोसिएशन, पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि फौजदारी न्यायालय यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी येथील न्यायालयात ‘मेडिएशन अवेअरनेस प्रोग्राम’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत मेडिएशन अवेअरनेसबाबत तज्ज्ञ मार्गदर्शकांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर. व्ही. कोकरे यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यशाळेला मान्यवरांची उपस्थिती
या एकदिवसीय कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी पिंपरी-चिंचवड अॅडव्होकेटस बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. किरण पवार हे होते. यावेळी अॅड. सुहास पडवळ, अॅड. सुजाता बीडकर, अॅड. ज्योती सोरगजे, अॅड. राधा जाधव, अॅड. चित्रा फुगे, अॅड. सरला निकाळे, अॅड. ज्योती गायकवाड, अॅड. तारा नायर, अॅड. मेरी रणभिसे, अॅड. उर्मिला काळभोर, अॅड. सुनील कड, अॅड. रमेश जाधव, अॅड. ए. टी. गायकवाड, अॅड. सुदाम साने, अॅड. अतीश लांडगे आदी उपस्थित होते.
तडजोड दोन्ही पक्षकारांसाठी योग्यच
या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना आर. व्ही. कोकरे म्हणाले की, कोणत्याही प्रकरणाच्या प्रकरणात तडजोड करणे कधीही चांगले असते. तडजोडीने प्रकरणे मिटल्यास दोन्ही पक्षकारांमध्ये कटुता राहत नाही. त्यामुळे वर्षानुवर्ष या ना त्या कारणाने प्रलंबित राहणारे दावेदेखील तडजोडीने लवकर निकाली लागतात. त्यात दोन्ही पक्षकारांना समाधान मिळते. म्हणूनच तडजोड हा पर्याय दोन्ही पक्षकारांसाठी योग्यच असतो, असे कोकरे यांनी सांगितले. मेडिएशन अवेअरनेस प्रोग्रामबाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
न्यायाधीशांनी केले मार्गदर्शन
पिंपरी-चिंचवड अॅडव्होकेटस बारचे अध्यक्ष अॅड. किरण पवार यांनी मेडिएशनबाबत वकिलांची भूमिका मांडली. तर अॅड. विलास कुटे यांनी संकल्पना मांडली. पिंपरी न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश ए. ए. धुमकेकर यांनीदेखील पक्षकार व वकील वर्ग यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसांलन अॅड. प्रतीक जगताप यांनी केले. प्रास्ताविक ए. ए. धुमकेकर यांनी केले. अॅड. प्रमिला गाडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे नियोजन पिंपरी अॅडव्होकेटस बार असोसिएशनच्या अॅड. प्रमिला गाडे, अॅड. काजल वायकर, दुर्गेश जमादार यांनी केले.