पिंपरी पोलिसांनी आवळल्या अट्टल चोरट्यांच्या मुसक्या!

0

पिंपरी-चिंचवड : मोबाईल शॉपी फोडणार्‍या आणि वाहन चोरी करणार्‍या दोन सराईत गुन्हेगारांच्या पिंपरी पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. ही कारवाई पिंपरी भाजीमंडई येथे करण्यात आली. अटकेतील दोघांकडून 1 लाख 55 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कृष्ण बाबू जलनिला (वय 22) आणि विशाल नामदेव गुंजाळ (वय 22, दोघे रा. दत्तनगर झोपडपट्टी, चिंचवड) अशी अटक करण्यात आलेल्या दोघा चोरट्यांची नावे आहे. या दोघांच्या अटकेनंतर मोबाईल शॉपी फोडून मुद्देमाल लांबवणे तसेच वाहन चोरीचे तब्बल आठ गुन्हे उघडकीस आले आहेत, अशी माहिती परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्त गणेश शिंदे यांनी सोमवारी दुपारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सहायक पोलिस आयुक्त राम मांडुरके व पिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांची उपस्थिती होती.

खबर्‍याकडून मिळाली माहिती
पिंपरी पोलिस हद्दीत गस्त घालत होते. पिंपरीतील भाजीमंडई येथे आरोपी कृष्ण जलनिला व विशाल गुंजाळ हे चोरीचे मोबाईल विक्री करत असल्याची माहिती पिंपरी पोलिसांना खबर्‍याकडून मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांनी तातडीने सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे मोबाईलविषयी विचारणा केली असता, ते सुरुवातीला पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देत होते. परंतु पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच, आरोपींनी चिंचवड येथील जय भवानी मोबाईल शॉपी फोडून मोबाईल चोरून आणल्याची कबुली दिली, असे पोलिसांनी सांगितले.

सात दुचाकी जप्त
पोलिसांनी आरोपींकडून विविध नामांकित कंपनीचे 35 हजार रुपये किंमतीचे 9 मोबाईल फोन जप्त केले आहेत. पोलिस कोठडीत असताना आरोपींकडे कसून चौकशी केली. त्यावेळी आरोपींनी शहरातून ठिकठिकाणी दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून 1 लाख 20 हजार रुपये किंमतीच्या 7 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. पिंपरी पोलिस ठाण्याकडील तीन, कोरेगाव आणि विश्रांतवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एक असे वाहन चोरीचे सात गुन्हे उघडकीस आले आहेत. दोघांची कसून चौकशी सुरू असून, त्यांच्याकडून अजूनही चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

यांच्या पथकाने केली कारवाई
कृष्णा जलनिला हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर निगडी आणि पिंपरी पोलिस ठाण्यात विविध गुन्हे दाखल असल्याचे, पोलिसांनी सांगितले.

ही कारवाई पोलिस निरीक्षक (गुन्हे) मसाजी काळे, पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल बढे, हरीश माने, सहायक फौजदार अरूण बुधकर, राजेंद्र भोसले, नागनाथ लकडे, शाकीर जेनेडी, महादेव जावळे, लक्ष्मण आढारी, संतोष दिघे, दादा धस, शैलेश मगर, उमेश वानखेडे, रोहित पिंजरकर आणि संतोष भालेराव यांच्या पथकाने केली.