पिंपरी-चिंचवड (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र पोलिस आयुक्तालय स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने अखेर घेतला. त्यामुळे पुणे शहरात नियुक्तीस असलेल्या पोलिस कर्मचार्यांपासून वरिष्ठ अधिकार्यांना या नव्या आयुक्तालयात बदलीचे डोहाळे लागले आहेत. बदलीची प्रक्रिया कधी सुरू होते आणि त्यासाठी अर्ज कधी करू, अशी अवस्था काहींची झाली आहे. तसेच, पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त हा पुण्याप्रमाणेच अतिरिक्त पोलिस महासंचालक या पदावरील अधिकारी असणार आहे. पुणे पोलिस आयुक्तांच्या बदलीची चर्चाही सध्या जोरात आहे. तसेच, अनेकांनी क्रीम पोस्टिंग मिळविण्यासाठी जोरदार धडपड सुरु केली असल्याची माहितीही चर्चेतून हाती आली आहे.
अनेक वरिष्ठ अधिकारी येण्यासाठी तयार!
पिंपरी-चिंचवड शहरातील गुन्हेगारी आटोक्याबाहेर गेली असताना, पिंपरी-चिंचवड म्हणजे पोलिसांसाठी ‘क्रीम’ पोस्टिंग ठरु लागले आहे. दरवर्षी होणार्या बदल्यांमध्ये एखाद्याची पिंपरी-चिंचवडमधून पुण्यात बदली झाल्यास त्याला ‘शिक्षा’ मिळाली, अशी चर्चा आयुक्तालयात रंगते. आता तर स्वतंत्र पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाचा कारभार असल्याने पुण्यातून अनेक कर्मचारी, उपनिरीक्षक, सहायक निरीक्षक, निरीक्षक पदांवरील अधिकारी पिंपरी-चिंचवडमध्ये जाण्यासाठी इच्छुक आहेत. अनेक वरिष्ठ अधिकारी पुण्यात येण्यासाठी तयार असताना, पिंपरी-चिंचवडसाठी पहिले पोलिस आयुक्त कोण येणार? हा प्रश्न कायम आहे? पिंपरीत येणार्या नवीन अधिकार्याला संपूर्ण आयुक्तालयाची रचना करावी लागणार आहे. त्यामुळे येथे कोणाची वर्णी लागेल, याची उत्सुकता आहे.
पुणे शहर व पुणे ग्रामीणमधून येणार कर्मचारी
या नव्या आयुक्तालयामध्ये निगडी, पिंपरी, चिंचवड, भोसरी, सांगवी, वाकड, हिंजवडी, दिघी, चिखली, भोसरी एमआयडीसी या परिमंडळ-3मधील पोलिस ठाण्यांसह चाकण, आळंदी, देहूरोड, तळेगाव दाभाडे, तळेगाव एमआयडीसी या पाच अशा 15 पोलिस ठाण्यांचा समावेश असणार आहे. 15 पोलिस ठाणी, विविध आस्थापनांसाठी एकूण चार हजार 840 पदांची गरज आहे. त्यांपैकी दोन हजार 633 पदे नवीन भरणार आहेत. तर, पुणे शहर आणि पुणे ग्रामीण पोलिसांमधून दोन हजार 207 जण पिंपरी-चिंचवडसाठी वर्ग केले जाणार आहेत. त्या दृष्टीने ‘फिल्डिंग’ लावण्यास ते तयार आहेत. गेल्या एक तपापेक्षा जास्त कालावधीपासून पिंपरीसाठी नवीन आयुक्तालय सुरू करण्याची चर्चा रंगत होती. मात्र, या काळात पिंपरी-चिंचवड परिसरातील नवीन बांधकामे, लोकसंख्या झपाट्याने वाढत गेल्याने पोलिसांवर ताण निर्माण झाला. येथील अनेक गुन्हेगारी टोळ्या सक्रिय झाल्याने रोज गंभीर गुन्हे घडू लागले. आजही पुणे शहरापेक्षा पिंपरी-चिंचवडमधील गुन्हेगारीचा आलेख चढताच आहे.