पिंपरी महापालिकेत भाजपची हुकूमशाही!

0

पिंपरी-चिंचवड : राष्ट्रवादी काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे खोटेनाटे आरोप करुन भाजपने पिंपरी महापालिकेत सत्ता काबीज केली. मात्र, अवघ्या चार महिन्यातच भाजपच्या भ्रष्टाचाराची तक्रार पंतप्रधान कार्यालयाकडे करण्यात आली. स्वार्थ, आपमतलबीपणात भाजपची मंडळी पुरती गुरफटली आहे. जनतेच्या प्रश्नांपेक्षा स्वत:चे महत्त्व वाढविण्यात ते दंग आहेत. महापालिका सभागृह कसे चालवावे हेदेखील न कळणारे भाजपवासीय सत्तेमुळे भांबावून गेले आहेत, अशी खरमरीत टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते अजित पवार यांनी केली. महापालिकेतील पत्रकार कक्ष तोडणार्‍या, विरोधी पक्षनेत्याला दालनही न मिळवून देणार्‍या भाजपचा कारभार हुकूमशाही पद्धतीने सुरु असल्याचा आरोपही त्यांनी केला.

कामे करूनही पराभव झाल्याचे वाईट वाटते!
राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात झाला. त्यावेळी अजित पवार बोलत होते. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, युवक प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते – पाटील, युवती प्रदेशाध्यक्षा स्मिता पाटील, शहराध्यक्ष संजोग वाघेरे – पाटील, माजी आमदार विलास लांडे, विरोधी पक्षनेते योगेश बहल, माजी महापौर मंगला कदम, अपर्णा डोके, डॉ. वैशाली घोडेकर, शकुंतला धराडे, अनिता फरांदे, ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर, नाना काटे, दत्ता साने आदी उपस्थित होते. पवार म्हणाले, गेल्या पंधरा वर्षात पिंपरी – चिंचवड शहराचा कायापालट केला. विकासकामांचा डोंगर उभारला. महापालिकेच्या चहाचादेखील आपण मिंदा राहिलो नाही. तरीही महापालिका निवडणुकीत आमचा पराभव झाला. कामे करुनही पराभव झाल्याने वाईट वाटले. या पराभवाची जबाबदारी माझीच आहे. त्याचा दोष मी कोणाला देणार नाही.

भाजपात गोंधळ, पक्षात महत्व वाढविण्यासाठी धडपड
विरोधकांच्या आरोपांना भुलून मतदारांनी मतदान केल्याचे सांगून अजित पवार म्हणाले, आता चार महिन्यातच भ्रमनिरास झाल्याचे मतदार म्हणत आहेत. नवी मुंबई, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता असताना ही शहरे सर्वच बाबतीत पहिल्या क्रमांकावर होती. परंतु, आता हीच शहरे पिछाडीवर आहेत. सत्ता मिळाल्याने भाजपचे लोक भांबावले आहेत. कोणाचा कोणाला ताळमेळ नाही. कोणालाही शहर विकासाशी देणेघेणे नाही. पक्षात आपले महत्व वाढविण्यावरच सगळ्यांचा भर आहे. कोणाचे कोण ऐकत नाही की जुमानत नाही. केवळ फायद्याची, स्वार्थाची कामे केली जात आहेत. साधा पीएमपीएमएलचा अधिकारीदेखील यांचे ऐकत नाही. पालकमंत्र्यांचे शहराकडे लक्ष नाही. पीएमआरडीएचे कार्यालय पुण्यात नेण्यात आले. शहर विकास नव्हे तर भकास करण्याच्या दृष्टीने भाजपची पाऊले पडत आहेत. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी भाजपच्या चुकीच्या कामांना प्रखरपणे विरोध करावा. बिल्डरधार्जिण्या निर्णयाविरोधात वाचा फोडावी, असेही अजित पवार यांनी सांगितले.

अपयशाचे आत्मपरीक्षण करू : तटकरे
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले, पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघात आपल्याला अपयश का आले याचे आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. विकासकामे करुनही पराभव झाल्याची खंत मनात आहेत. परंतु, यापुढे सर्वांनी एकदिलाने काम करावे. एका पराभवामुळे खचून न जाता तातडीने, जोमाने काम करावे, पक्षसंघटन मजबूत करावे असेही तटकरे यांनी सांगितले. चित्रा वाघ म्हणाल्या, जाहिरातबाजी करुन भाजप सत्तेत आला आहे. जे वायदे केले होते. त्यापैकी एकही वायदा पूर्ण झालेला नाही. भाजपच्या राजवटीत कोणीही सुखी नाही. गृहराज्यमंत्र्याचे वडील सर्वसामान्य नागरिकांच्या कानशिलात लगावतात. परंतु, त्यांच्यावर साधा गुन्हाही दाखल होत नाही. महिला, मुलींवर अत्याचार होत आहेत. कारागृहातील महिलादेखील सुरक्षित नाहीत. कारागृहातील भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठविल्यामुळेच मंजुळा शेट्येला जीव गमवावा लागल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.