चाळीसगाव । तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगाव अंतर्गत पिंपळगाव येथील उपकेंद्रांचा नवीन लूक व दर्जेदार रूग्णसेवेमुळे परिसरातील ग्रामीण जनतेला दिलासा मिळेल, असा विश्वास वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद सोनवणे यांनी व्यक्त केला आहे. जागतिक आरोग्य दिनाच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. उपकेंद्रांला नवा लुक देण्यासाठी आरोग्यसेवक अशोक परदेशी व आरोग्यसेविका योगिता शिंदे यांनी मेहनत घेतली आहे.
आवारात नियमित स्वच्छता
आवारात नियमित स्वच्छता राखल्याने प्रसन्न वातावरण निर्माण झाले असून हे रूग्णांसाठी लाभदायक असल्याचे सांगण्यात आले. केंद्र सरकारच्या संकल्प ते सिद्धी या अभियानात ही स्वच्छता मोहीम राबविल्याचे अशोक परदेशी यांनी सांगितले. या उपकेंद्र रंगकामाचा सर्व खर्च आरोग्यसेवक परदेशी व शिंदे यांच्यासह वैद्यकीय अधिकारी डॉ प्रमोद सोनवणे यांनी केला आहे. उपकेंद्रांतील प्रसृती कक्षाची खोली व हॅण्डमेड बेबी वार्मर पेटी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. उपकेंद्रातील सेवेचा दर्जा अधिक सुधारण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आरोग्यसेविका योगिता शिंदे यांनी सांगितले. रूग्ण कल्याण समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख व पंचायत समितीचे सदस्या प्रिती विष्णू चकोर व पंचायत समितीचे सदस्य अजय पाटील यांनीही सर्व आरोग्य कर्मचारी व प्रथम वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद सोनवणे आणि वैद्यकीय अधिकारी डॉ.आशा राजपुत यांचे कौतुक केले आहे.