पिंपळनेर । येथील शांताई एज्युकेशन सोसायटी संचलित प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात आला. योगामुळे प्रत्येकाला निरोगी आरोग्य लाभत आहे. त्याचा फायदा समाज व पर्यायाने देशाचे स्वास्थ्य उत्तम ठेवण्यावर होतो. तेव्हा प्रत्येकाने योगावर अधिक भर द्यावा, असे आवाहन शाळेचे मुख्याध्यापक एस.जे.बागुल यांनी केले. अलिकडील आहाराची पद्धत, ऋतूतील फरक व पोषक हवामानाच्या अभावाने मानवी शरीर कमजोर बनत आहे. या शरीराला सक्षम करण्यासाठी योगाची नितांत गरज आहे. योगामुळे निरोगी, मानसिक समाधान, प्रसन्नता व चांगल्या विचारांचे संकलन आपण उत्तमपणे मिळवू शकतो. हे प्रत्येकांनी साध्य केल्यास समाज व पर्यायाने देश सदृढ, सक्षम बनवणे शक्य होणार आहे असेही सांगण्यात आले. यावेळी एच. आर.बाविस्कर यांनी ताडासन, वृक्षासन, उत्तानासन, अर्धचक्रासन, त्रिकोणासन, भद्रासन, शशांकासन,अर्धउष्ट्रासन, मरिच्चासन, वक्रासन, भुजंगासन, शवासन, मकरासन, पाठीवर झोपून सेतुबंध, सर्वागासन, पवनभुक्तासन, शवासन आदी आसने सादर केली. योगा कार्यक्रमात विद्यार्थी, विद्यार्थिनींसह शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी सहभाग घेऊन योगाची प्रात्यक्षिके केली.
जि.प.केंद्रशाळा, देशशिरवाडे
जि.प.केंद्रशाळा देशशिरवाडे येथे जागतिक योगा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा जयश्री कदम, मुख्याध्यापक प्रतिभा देवरे,संगिता रायते, उज्वला सोनवणे तसेच योगासनांचे प्रात्यक्षिक अनिल काकुस्ते यांनी करुन दाखवले. यावेळी ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते. संजय गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कुडाशी येथे योग दिनानिमीत्त विद्यार्थ्यांना उपशिक्षक किरण शिनकर योगाचे धडे दिले. राजे छत्रपती इंग्लिश मिडियम स्कुल मध्ये जागतिक योग दिनानिमित्त संस्थेचे चेअरमन श्री.अहिरराव मुख्याध्यापिका सोनाली पाटील तसेच सर्व शिक्षक वृंद यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.