महाराष्ट्रासह गुजरात, मध्यप्रदेश,दिल्ली, हरियाणा येथील नामवंत पहेलवानांनी खेळले डावपेच
पिंपळनेर । येथील गुरूवार 29 ऑगस्ट रोजी विठ्ठल मंदिरात पहाटे काकड आरती झाली. पिंपळनेर शहराचे वैभव असलेल्या खंडोजी महाराज यात्रोत्सवाची सांगता मंगळवारी झाली. या रात्रीला पूर्वीपासून कत्तलची रात्र असे म्हटले जाते. विठ्ठल मंदिरातून पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. खंडोजी महाराजांच्या पादुका,तीनशे वर्षांपूर्वीची हस्तलिखित गीता व श्री.कृष्णाची पुरातन मूर्ती असणार्या पालखी सोहळ्यात विविध ठिकाणांहून आलेल्या दिंड्या सहभागी झाल्या.मधुर संगीत व कीर्तनाच्या तालावर भक्त तल्लीन झाले होते. पालखी मार्गात विविध मंडळांकडून व राजकीय पक्षांकडून रांगोळी काढून पुष्पवृष्टी करण्यात आली.
विठ्ठल मंदिरातून पालखीची शहरातून भव्य मिरवणूक ; पोलिसांचा चोख बंदोबस्त
मुस्लिम बांधवांच्यावतीने पालखीचे स्वागत
189 वर्षाचा जातीय सलोखा आजही कायम ठेवत मध्यरात्री शहरातील जामा मशिद समोर जहागिरदार कुटुंब व मुस्लिम बांधवांच्या वतीने पालखीचे व योगेश्वर महाराज देशपांडे यांना मानाची वस्त्रे देऊन यांचे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी जुहूर जहागिरदार, अल्ताफ सैय्यद, लियकात सैय्यद, अल्ताफ शेख, शकील शेख, लतीफ कुरेशी आदी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याचप्रमाणे विविध मंडळांकडून पारंपारिक पद्धतीने पायदळी सोंगे व पौराणिक दृश्यांवर आधारीत सजीव चित्ररथ सादर करण्यात आले. दरम्यान,कलियुग मित्रमंडळ मोची गल्लीच्या वतीने काढण्यात आलेले मार्तंड महाकाल या वहनास प्रथम क्रमांकाचे 5,100 रुपयांचे रोख बक्षीस कुस्ती समितीच्या वतींने देण्यात आले तर, जय बजरंग मंडळ भगवा चौकच्या भस्मासुराचा वध या वहनाला द्वितीय क्रमांक देण्यात आला. बुधवार 30 ऑगस्ट रोजी कुस्ती मैदानावर भव्य कुस्त्यांची दंगल झाली असून महाराष्ट्रासह गुजरात, मध्यप्रदेश,दिल्ली, हरियाणा येथील नामवंत पहेलवानांनी डावपेच खेळले व आपले कौशल्य दाखवून कुस्त्या जिंकल्या मनाची सर्वात मोठी कुस्ती दिल्ली येथील कुलदीपसिंग दहिया यांनी हरियाणा येथील रोहित कुमारला पछाडून बाजी मारली.
कुस्ती स्पर्धांसह विविध कार्यक्रम
या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार विजयकुमार गावित यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मठाधिपती योगेश्वर देशपांडे, आमदार डी.एस.अहिरे, हर्षवर्धन दहिते, अॅड. ज्ञानेश्वर एखंडे,संजय ठाकरे, उत्पल नांद्रे, डॉ.तुळशीराम गावित, योगेश नेरकर, शंकर माळी, राजेंद्र शिरसाठ आदी मान्यवरांसह कुस्ती समितीचे पंच म्हणून सुफम पगारे, जे.टी. नगरकर, तुळशीराम दहिते, वसंत चौधरी, राजेंद्र पाटील, भैय्या बाविस्कर, संभाजी ढोले व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 31 रोजी भव्य आदीवासी नृत्य स्पर्धा झाली. या संपूर्ण यात्रेच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला.