पिंपळनेर येथे नामसप्ताह यात्रोत्सवाचे आयोजन

0

पिंपळनेर। प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही श्री विठ्ठल मंदिर संस्थानतर्फे अखंड व प्रदीर्घ परंपरा असणार्‍या येथील श्री समर्थ सदगुरू खंडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त 189 वा श्री नामसप्ताह महोत्सवास 22 ऑगस्ट पासून प्रारंभ झाला आहे. भाविकांनी या आध्यात्मिक सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन संस्थानाधिपती हभप. योगेश्वर महाराज यांनी केले आहे. श्री समर्थ सदगुरू खंडोजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त रोज पहाटे भूपाळी व काकडारती,सकाळी गीतापाठ,महापूजा व नामसंकीर्तन भजन सोहळा दुपारी संत तुकाराम महाराज गाथा अभंग निरूपण स्पर्धा सायंकाळी महिलांचे भंजन , हरीपाठ हनुमान चालीसा पाठ व रात्री भजन आरती व संकीर्तन होईल. कीर्तनकार म्हणून हभप प्रतिभा महाराज खेडगाव, हभप. त्र्यंबक महाराज शेजवलकर, हभप पुंडलिक महाराज खडकतळे, उमेश महाराज गांगुर्डे धुळे, हभप.विजय महाराज काळे पिंपळनेर व हभप योगेश्वर महाराज देशपांडे यांची सेवा लाभणार आहे.

31 ऑगस्टला आदिवासी नृत्यस्पर्धा
मंगळवार 22 रोजी संस्थापक श्री यादवराव महाराज यांची 199 वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. 28 ऑगस्ट रोजी श्री समर्थ सदगुरू खंडोजी महाराजांची पुण्यतिथी साजरी करण्यात येणार आहे. यादिवशी महापूजा,पादुका पूजन, भजनी दिंडीसह समाधी दर्शन,दि.29 रोजी महाकाकडारती व पालखी सोहळा पहाटेपर्यंत साजरा होईल. नामसप्ताह महोत्सवाचे सर्वात जास्त आकर्षण असणार्‍या कुस्त्यांच्या दंगलीचा कार्यक्रम बुधवार 30 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला आहे. परराज्यातून पहेलवान या ठिकाणी खेळाचे कौशल्य व नैपुण्य दाखविण्यासाठी येतात. तर दुसर्‍या दिवशी 31 रोजी आदिवासी नृत्य स्पर्धा होतील. यास्पर्धेत धुळे, नाशिक व नंदुरबार जिल्ह्यातील तसेच ठाणे पालघर जिल्ह्याचे नृत्य स्पर्धेत गट सहभागी होतात. यावर्षीही स्पर्धकांना सहभागी होण्याचे आवाहन संस्थानाधिपती हभप. योगेश्वर देशपांडे यांनी केले आहे.