पिंपळीतील बारामती ग्रेप इंडस्ट्रिज लिमिटेडने द्राक्ष उत्पादकांना दिला झटका

0

बारामती । बारामतीनजीकच्या पिंपळी येथील बारामती ग्रेप इंडस्ट्रिज लिमिटेड या कंपनीने द्राक्ष उत्पादकांना चांगलाच झटका दिला आहे. वायनरीसाठी लागणार्‍या द्राक्षांना गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी भाव मिळत असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.बारामती ग्रेप इंडस्ट्रिज लिमिटेड कंपनी पिंपळी येथे सुरू झाल्यानंतर या भागातील शेतकर्‍यांनी वायनरीसाठी लागणार्‍या काळ्या द्राक्षांची फार मोठ्या प्रमाणात लागवड केली. सुरुवातीच्या काळात चांगला दर मिळाल्यामुळे शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले होते. शेतकर्‍यांनी द्राक्ष बागांच्या लागवडीतही मोठ्या प्रमाणात वाढ केली. आवक वाढल्यामुळे कंपनीने द्राक्षाची साठवण क्षमताही वाढवली. त्यामुळे दरात घसरण करण्यास सुरुवात केली. शेतकर्‍यांना आता याचा चांगलाच फटका बसत आहे.

तीन रुपयांनी दर कोसळले
गतवर्षी कंपनीने 22.50 रुपये प्रतिकिलोने द्राक्ष विकत घेतली होती. यंदा हा दर तीन रुपयांनी कमी केला असून तो 19 रुपये 50 पैसे असा केल्यामुळे द्राक्ष उत्पादक प्रचंड अडचणीत आले आहेत. मॅकडॉल या ब्रँन्डच्या नावाने येथे दारू बनविली जाते. मात्र अचानकपणे तीन रूपये दर कमी केल्यामुळे शेतकर्‍यांचे आर्थिक गणितच कोसळले आहे.

शेतकरी हवालदिल
या भागातील द्राक्ष उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. कंपनीने शेतकर्‍यांची आर्थिक कोंडी केली असून मातीमोल भावाने द्राक्ष घेण्याचे सत्र सुरू केले आहे. कंपनीने याबाबत चांगलीच गोपनीयता पाळली असून अधिकारी वर्ग याबाबत काहीही बोलण्यास तयार नाही. शेतकर्‍यांसमोर दुसरा कोणताही पर्याय नसल्याकारणाने एक तर बागा उद्धवस्त करणे किंवा आहे त्या पडलेल्या किंमतीत द्राक्ष कंपनीला विकणे एवढे दोनच पर्याय शेतकर्‍यांसमोर आहेत.

कंपनीची विक्री
कंपनी व शेतकरी यांच्यात झालेला करार गोपनीय ठेवण्यात आला आहे. याबाबतची अधिक माहिती कंपनीकडून मिळत नाही. विजय मल्ल्याच्या युनायटेड ब्रेव्हरीजची ही कंपनी इंग्लंडच्या डिओजो या ग्रुपने हस्तांतरीत केली आहे. बारामती गे्रप इंडस्ट्रिजने आपले सर्व शेअर्स इंग्लंड येथील डिआजिओ या कंपनीला विकलेले आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांप्रती बारामती गे्रप इंडस्ट्रिजची जबाबदारी संपली आहे.

कंपनीकडून आर्थिक शोषण
राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस शेतकर्‍यांसाठी आंदोलन करीत आहे. मात्र, बारामती तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी वार्‍यावर सोडला असून कंपनीकडून होत असलेल्या या आर्थिक शोषणाविरूध्द राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलन करणार का असा खडा सवाल द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांनी उपस्थित केला आहे. खुद्द बारामतीतच शेतकर्‍यांचे आर्थिक शोषण होत असून याविषयी राष्ट्रवादीचे पदाधिकारी चकार शब्दही बोलण्यास तयार नाहीत. त्यामुळे आम्ही न्याय कुणाकडे मागायचा, असा प्रश्‍न येथील शेतकर्‍यांना पडला आहे.