बारामती । पिंपळी लिमटेक ग्रामपंचायतीच्या गैरव्यवहाराबाबत पंचायत समितीच्या प्रवेशद्वाराजवळ सुरू असलेल्या उपोषणाचा शनिवारी 20 वा दिवस होता. पंचायत समिती प्रशासन उपोषणकर्त्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करीत असून याचाच एक भाग म्हणून उपोषणकर्त्यांना 13 नोव्हेंबरला सकाळी 11 वाजता पुण्यात सुनावणीसाठी बोलविण्यात आले आहे. जिल्हापरिषदेचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी यांच्यासमोर पुणे जिल्हापरिषदेत याबाबत सुनावणी होणार आहे. त्यामुळे उपोषणकर्त्यांनी चक्रीय उपोषणाऐवजी आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.
उपोषण मागे घेण्याचे प्रयत्न
उपोषणकर्त्यांना पुण्याला बोलविण्याऐवजी उपोषणकर्त्यांनी दिलेल्या पुराव्यानुसार कारवाई का केली जात नाही हाच एक मोठा प्रश्न चर्चेचा आहे. हे उपोषण लवकर मागे घ्यावे यासाठी वेगळ्या पातळीवरती प्रयत्न सुरू आहेत. मात्र उपोषणकर्त्यांचा ठाम निर्धार तसेच न्याय मिळालाच पाहिजे या भूमिकेमुळे प्रशासन मवाळ भूमिका घेत आहे. परंतु गैरव्यवहार करणार्यांना पाठीशी घातले जात असल्याचा आरोप आंदोलनकर्ते करीत आहेत. प्रशासनाकडून ठामपणे कारवाईचे आश्वासनही दिले जात नाही. एकूणच ही अवघड परिस्थिती पाहता उपोषणाचा काय निर्णय होतोय याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहीले आहे.
…तर 120 ग्रामपंचायतींची चौकशी
पंचायत समितीच्या अधिकार्यांनी गैरव्यवहाराविषयी कारवाई करण्याऐवजी वेगवेगळ्या प्रकारे वेळकाढू धोरण अवलंबित आहेत. पुरावे देऊन देखील कारवाईस टाळाटाळ केली जात आहे. याचे महत्त्वाचे कारण पिंपळी ग्रामपंचायतीवर कारवाई झाल्यास बारामती तालुक्यातील जवळपास 120 ग्रामपंचायतींची चौकशी करून कारवाई करावी लागेल. त्यामुळे प्रशासन कारवाई करण्यास टाळाटाळ करीत आहे. वास्तविक पाहता मासाळवाडी ग्रामपंचायतीत मोठा गैरव्यवहार झाला असून त्याकडे तक्रारी करूनदेखील टाळाटाळच केली जात आहे. याकडेही लक्ष वेधले जात आहे.