सांस्कृतिक कार्यक्रमांसह खाद्य पदार्थांची मेजवानी
पिंपरी-चिंचवड : महापालिकेच्या वतीने शुक्रवार (दि.23)पासून आदिवासी सांस्कृतिक आणि खाद्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या तीन दिवसीय महोत्सवात आदिवासी नृत्य, गौरी नाच, संभळ नृत्य, मोखाडा, तारपा नृत्य अशा सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. त्याचबरोबर खवय्यांना आदिवासी पदार्थ खाण्याची हौस भागविता येणार आहे. खेकडा, रानभाज्या, हुलग्याची शिंगोडी खवय्यांसाठी ही खास मेजवाणी असणार आहे. याबाबतची माहिती जैव विविधता व व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा उषा मुंढे यांनी आज मंगळवारी दिली.
शुक्रवार ते रविवारी महोत्सव
पिंपळेगुरव येथील सृष्टी चौकात 23 ते 25 नोव्हेंबर 2018 दरम्यान होणा-या या महोत्सवाचे शुक्रवारी (दि.23) सायंकाळी सहा वाजता भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. यावेळी महापौर राहुल जाधव उपस्थित राहणार आहेत. आदिवासी सांस्कृतिक आणि खाद्य या तीन दिवसीय महोत्सवात आदिवासींच्या चालिरिती, रुढी, परंपरांचा जागर केला जाणार आहे. रात्री दहा वाजेपर्यंत महोत्सवातील कार्यक्रम होणार आहेत. या महोत्सवात राज्यभरातील आदिवासी नागरिक सहभागी होणार आहेत. दररोज सायंकाळी सहानंतर सांस्कृतिक कार्यक्रम असणार आहेत. त्यामध्ये आदिवासींचे गोंडी, भलर, मोखाडा, तारपा, संभळ नृत्य, तूरनाच, गौरी नृत्य सादर केले जाणार आहे. महिलांची लेझीम पथक, शाहिरी जलसाचे देखील कार्यक्रम होणार आहे.
खाद्यपदार्थात खेकड्यांचेच प्रकार
खाद्य महोत्सवात खेकडा, रानभाज्या, हुलग्याची शिंगोडी खवय्यांसाठी ही खास मेजवाणी असणार आहे. त्यामध्ये खेकडे जास्त असणार आहेत. खाद्य महोत्सवात 30 स्टॉल असणार आहेत. त्यामध्ये सर्वाधिक 15 स्टॉल खेकड्याचे असणार आहेत. स्टॉलसाठी बचत गटातील आदिवासी महिलांना प्राधान्य दिले आहे. त्यांनी उत्पादिक केलेल्या मालांना बाजारपेठ मिळणार आहे. त्यातून महिला बचत गटांना आर्थिक बळ मिळणार आहे. त्याचबरोबर नामांकित व्यक्तींची आदिवासींच्या रुढी, परंपरांवर मार्गदर्शपर व्याख्याने होणार आहेत.
शोभायात्रा, ढोलवादन, लेझिम
शुक्रवार सायंकाळी पाच वाजता शोभायात्रा काढली जाणार आहे. उद्घाटनानंतर शिवसह्याद्री ढोल पथकाचे सादरीकरण, भिमाशंकर येथील आदिवासी महिला पथकाचे लेझीम सादरीकरण होणार आहे. सायंकाळी आठ वाजता प्रा. हेमंत मुकणे यांचे ’महादेव कोळी जमातीचा राजकीय इतिहास’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. त्यानंतर शरद टिपे आणि त्यांच्या सहका-यांचा शाहिरी जलसाचा कार्यक्रम होईल. त्यानंतर गौरी नाच, संभळ नृत्य, मोखाडा, तरपा नृत्याचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. शनिवारी सायंकाळी सहा वाजता आदिवासी महिलांचा लेझीम सादरीकण होणार आहे. त्यानंतर आदिम प्रबोधन यांचा शाहिरी जलसा, तूरनाच वाडा, प्रा. नितीन तळपडे यांचे ’आदिवासी समाजासमोरील आव्हाने’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. त्यानंतर गोंडी, भलर नृत्य, आसाने, गौरी नृत्याचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. रविवारी (दि.25) सायंकाळी सहा वाजता लेझीम पथक, शाहिरी जलसा आणि तूरनाच, महादेव लग्न परंपरा असा सांस्कृतिक कार्यक्रम होणार असल्याचे, नगरसेविका मुंढे यांनी सांगितले.