विशालनगर परिसरातील घटना; सांगवी पोलिसात गुन्हा
सांगवी : पिंपळे गुरव येथील विशालनगर परिसरात अज्ञात चोरट्यांनी एका बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून सोने-चांदीचे दागिने, रोकड लंपास केली. धक्कादायक बाब म्हणजे चोरट्यांनी घराजवळच्या पार्किंगमध्ये लावलेली कारदेखील चोरून नेली. ही घटना बुधवारी (दि. 23) रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाचच्या दरम्यान घडली. या घटनेत चोरट्यांनी कारसह सुमारे पावणे चार लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तीन लाख 86 हजारांचा ऐवज
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळे गुरवमध्ये असलेल्या विशालनगरातील नेहा रेसिडेन्सीत राहणारे शशांक सिन्हा यांच्या राहत्या घरात ही चोरी झाली आहे. या घटनेबाबत शशांक सिन्हा यांनी सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांचे घर बंद असताना त्याचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून कपाटातील निकॉन कॅमेरा, सोने-चांदीचे दागिने तसेच घराच्या पार्किंगमधील कार असा एकूण तीन लाख 86 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.