पिंपळे गुरवला जाहिराती ‘झाडाला’ लागतात!

0

जहिरातबाजीमुळे वाढले विद्रुपीकरण
नवी सांगवी : सध्या मार्केटिंगचे आणि स्पर्धेचे युग आहे या मार्केटिंगच्या युगात जाहिरात करणे हा व्यवसायाचा अविभाज्य घटक आहे. मात्र व्यवसाय, मार्केटिंग आणि जाहिरातबाजी यांचे दुष्टचक्र सध्या झाडांच्या जणू मुळावरच उठले असल्याचे दिसून येत आहे. पिंपळे गुरव, सांगवी, नवी सांगवी परिसरातील अनेक वृक्षांवर बेकायदा जाहिरात फलक लावल्यामुळे संपुर्ण परिसरच विद्रूपीकरणाच्या विळख्यात सापडला आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ‘झाडे लावा,झाडे जगवा’ असा संदेश सर्वत्र दिला जातो. रस्त्यावरील झाडांवर, विद्युत व टेलिफोन खांबावर जाहिरात फलक लावल्यामुळे निसर्गसौंदर्यास बाधा निर्माण झाली आहे.

शासकीय यंत्रणेने कारवाई करावी
पर्यावरणवादी सामाजिक कार्यकर्ते अशोक जमाले म्हणाले की, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, महापालिका क्षेत्रामध्ये विनापरवाना जाहिरातीबाजी करणे गुन्हा आहे. तरीही याकडे कानाडोळा करून व्यवसायिक जाहिराती लावतच आहेत. प्रशासकीय यंत्रणेने याकडे डोळेझाक न करता कारवाईचे पाऊल उचलावे अशी मागणी नागरिक करीत आहेत. अनेक व्यवसायिक मोक्याच्या ठिकाणी असलेल्या अनेक झाडांच्या खोडाला बेकायदेशिर जाहिरातचे फलक लावत आहेत. एक जाहिरात लावण्यासाठी चार खिळे ठोकले जातात फलक बांधण्यासाठी तारेचाही वापर केला जातो नंतर त्या तारा झाडांच्या खोडात रूतून बसतात त्यामुळे झाडांच्या वाढीवर विपरित परीणाम होऊन काही झाडे सुकून जातात.