राहुल कलाटे आयोजित उपक्रमात ७ हजार नागरिकांचा सहभाग
पिंपरी :- पिंपळे सौदागरमध्ये शिवसेना गटनेते राहुल कलाटे आयोजित ‘थ्रीडी वॉकेथॉन’ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मधुमेह मुक्तीच्या प्रसारासाठी तसेच स्वस्थ आणि निरोगी आरोग्यासाठी काढलेल्या पाच किलोमीटरच्या या वॉकेथॉनमध्ये तब्बल ७ हजार नागरिकांनी सहभाग नोंदविला होता. डॉ.दीक्षित डाएटचे उद्गाते सो. श्रीकांत जिसकर यांच्या ६५ व्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते या वॉकेथॉनचे उद्घाटन झाले.
यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त नीलिमा जाधव, नगरसेवक अमित गावडे, डॉ. वेदा नलावडे, प्रा. दीपक येवले, आयोजक शिवसेना गटनेते राहुल कलाटे आदी उपस्थित होते.
पिंपळे सौदागर येथील कोकणे चौक-कल्पतरू चौक-कोकणे चौक या ५ किलोमीटरच्या मार्गावर हा वॉकेथॉन झाला. डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी मधुमेहमुक्त आणि कोलेस्ट्रॉलमुक्त भारतासाठी डॉ. दीक्षित डाएट (थ्रीडी) ही संकल्पना राबवली आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून मधुमेह मुक्तीसाठी जनजागृती करण्यात येते. मधुमेह झाल्याने खचून गेलेल्या नागरिकांना दीक्षित डाएटची माहिती देऊन नवी उमेद दिली जाते.
यावेळी राहुल कलाटे म्हणाले की, चिंचवड विधानसभेतील नागरिकांच्या आरोग्यासाठी आपण विविध प्रकारचे उपक्रम राबवित आहोत. आजच्या धावपळीच्या युगात सर्वांनाच आपल्या शरीराकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळत नाही. म्हणूनच अशा या उपक्रमामुळे नागरिकांना आरोग्याचे महत्व पटवून देण्याची संधी मिळाली. मी केलेल्या आवाहनाला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. सुमारे सात हजाराहून अधिक नागरिक या वॉकेथॉनमध्ये सहभागी झाले. यातच या उपक्रमाचे यश आहे. भविष्यातही नागरिकांच्या आरोग्यासाठी अशाच प्रकारे विविध उपक्रम राबविले जाणार आहेत असे आश्वासन राहुल कलाटे यांनी यावेळी दिले.
या थ्रीडी वॉकेथॉनमध्ये परिसरातील ७ हजारपेक्षा अधिक नागरिकांनी सहभाग घेतला. यावेळी सर्व सहभागींना टी शर्ट, टोपी आणि प्रमाणपत्र देण्यात आले. सुरुवातीला उपस्थितांना दीक्षित डाएटची माहिती देण्यात आली. त्याचे सकारात्मक परिणाम आणि बदललेल्या जीवनशैलीबाबत माहिती देण्यात आली.