पिंप्राळा येथे मातीचे छत कोसळून महिलेचा मृत्यू

0

जळगाव। शहरातील उपनगर असलेल्या पिंप्राळा येथील कुंभार वाड्यात मातीच्या घराचे छत अंगावर कोसळून 55 वर्षीय महिलेचा मातीच्या ढिगार्‍याखाली गुदमरून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सकाळी 6 वाजेच्या सुमारास घडली. सुमित्रा अशोक पाटील असे मयत महिलेचे नाव आहे. दरम्यान, छत कोसळ्यानंतर खोलीतून बाहेर येत असलेल्या वृध्द महिलेच्या व मुलीच्या अंगावरही छताच्या काहीसा भाग पडल्याने दोघे किरकोळ जखमी झाले आहेत. आईचा मृत्यू झाल्याचे कळताच जखमी मुलीने मन हेलवणारा आक्रोश केला. यावेळी मोठ्या प्रमाणात गावकर्‍यांची गर्दी जमली होती. ढिगार्‍याखाली दबल्या गेल्याने महिलेला बाहेर काढण्यासाठी शंभर ते दिडशे तरूणांनी मदत कार्य शुरू केले होते. अखेर पाऊन तासाच्या यशानंतर ढिगार्‍याखाली दबलेल्या महिलेचा मृतदेह बाहेर काढण्यात आले. या घटनेमुळे संपूर्ण पिंप्राळा परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत होती.

ढिगार्‍याखाली गुदमरून महिलेचा मृत्यू
पिंप्राळा येथील कुंभारवाड्यात अशोक धनसिंग पाटील हे पत्नी सुमित्रा, आई भिकुबाई तसेच मुलगी सोनी यांच्यासोबत वास्तव्यास आहेत. तर पाटील हे शेती व्यावसायातून आपल्या कुंटूंबियांचा उदरनिर्वाह करतात. नेहमी प्रमाणे रात्री जेवण झाल्यानंतर मंगळवारी रात्री पाटील कुटूंबिय झोपले. यानंतर दुसर्‍या दिवशी बुधवारी सकाळी पहाटे साडेपाच वाजता कुटूंबियांना जाग आल्यानंतर अशोक पाटील हे घराबाहेर येऊन बसले. तर पत्नी सुमित्रा ह्या घरात चहा बनविण्यासाठी घरातल्या मागच्या खोलीत बसल्या होत्या. यावेळी त्यांच्यासोबत सासु भिकुबाई व मुलगी सोनी ही देखील त्या खोलीत उपस्थित होती. सकाळी 6 वाजेच्या सुमारास भिकुबाई व सोनी हे खोलीचे दार उघडून पुढच्या खोलीत जाणार तेवढ्यातच घराच्या मागच्या खोलीचे ओले असलेले मातीचे छत अचानक खाली कोसळले. भिकुबाई व सोनी यांच्या अंगावर छताचा काही भाग पडला. मात्र, सुमित्रा या चहा बनविण्यासाठी बसल्या असल्यामुळे संपूर्ण मातीचे छत त्यांच्या अंगावर पडून त्या ढिगार्‍यात दाबल्या गेल्या. भिकुबाई व सोनी यांनी ओरडा-ओरड करताच अशोक पाटील यांनी घरात धाव घेतली. आरडा-ओरड ऐकल्यानंतर आजू-बाजूच्या परिसरात रहिवाश्यांनी घराकडे धाव घेतली. परंतू, ढिगार्‍याखाली गुदमरून सुमित्रा पाटील यांचा मृत्यू झाला.

ग्रामस्थांची मदत कार्यासाठी धावपळ
छत कोसळून मातीच्या ढिगार्‍याखाली महिला दाबल्या गेल्याची माहिती परिसरात कळताच कुंभारवाड्यासह कोळी वाड्यातील नागरिकांनी व तरूणांनी त्या ठिकाणी धाव घेतली. त्यांनी लागलीच महिलेस बाहेर काढण्यासाठी मदत कार्य सुरू केले. मातीच्या ढिगार्‍यामुळे दार उघडत नसल्याने तरूणांनी चक्क घराच्या भिंतीवरून उड्या घेत आत प्रवेश केला आणि मृतदेह बाहेर काढण्यासाठी टिक्कम, फावड्याने मातीला बाजूला सारण्यास सुरूवात केली. यावेळी गावातील ग्रामस्थांनी कुंभार वाडा येथे प्रचंड गर्दी जमली होती. संपूर्ण माती उकरून काढल्यानंतर अखेर पाऊन तासाच्या मदत कार्यानंतर तरूणांना मृतदेह बाहेर काढण्यास यश आहे. मात्र, मातीच्या ढिगार्‍यात अर्धा ते पाऊन तास दाबल्या गेल्यामुळे सुमित्रा पाटील यांचा मृत्यू झाला झाला होता.

घटनेच्या काही मिनिटाच भिकुबाई व सोनी यांना बाहेर काढण्यात असल्याने दोघे किरकोळ जखमी झाले होते. परंतू मातीच्या ढिगार्‍यातून सुमित्रा पाटील यांचा मृतदेह बाहेर काढल्यानंतर पती अशोक पाटील यांनी हंबरडा फोडला. आईचा मृत्यू झाल्याचे कळताच मुलगी सोनीने अक्षरक्षा: मनहेलवणारा आक्रोश केला. यानंतर सुमित्रा पाटील यांचा मृतदेह बाहेर काढल्यानंतर जिल्हा सामान्य रूग्णालयात पाठविण्यात आला. त्यावेळी वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यांची तपासणी केली केल्यानंतर मृत घोषित केले. सुमित्रा पाटील यांच्या पश्‍चात पती, सासू व तीन मुली असा परिवार आहे.

दोन वर्षापूर्वीही घडली होती अशीच घटना
पिंप्राळ्यातील रथचौक परिसरात सुरजबाई ओंकार पाटील या वृध्द महिला एकट्या राहतात. गेल्या दोन वर्षापूर्वी देखील यांच्या घराचे छत अंगावर कोसळून त्या छताखाली दाबल्या गेल्या होत्या. परिसरातील रहिवाश्यांनी मदत कार्य सुरू करत त्यांना कोसळलेल्या छता खालून बाहेर काढले होते. यावेळी त्यांच्या हाता-पायाला तसेच डोक्याल दुखापत झाली होती. यानंतर आज कुंभार वाड्यात घडलेल्या घटनेत सुमित्रा पाटील यांचा मृत्यू झाला. कुंभार वाडा तसेच कोळी वाडा परिसरात शेकडो मातीचे घरे आहेत. अशी घटना पुन्हा घडू नये, यासाठी नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. तसेच दुपारी तहसिलदार अमोल निकम यांनी घटनास्थळी जावून पाहणी करत प्रशासनातर्फे मदत देण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी कुटूंबियांना दिली.