पिंप्राळा हुडकोतील बालिकेचा संशयास्पद मृत्यू आई-वडिलांच्या जबाबात विसंगती

जळगाव- पिंप्राळा हुडकोमधील रझा कॉलनीतील 11 वर्षीय या बालिकेचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला. या बालिकेचा मृतदेह तिचे आई, वडील व काही नातेवाईकांनी परस्पर दफन केला. या संशयास्पद मृत्यूप्रकरणी बालिकेच्या मामाने पोलिसात तक्रार दिली. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसांनी बालिकेच्या आई-वडिलांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांच्या जबाबात विसंगती आढळली.
याप्रकरणी रामानंदनगर पोलिसांनी बालिकेच्या प्रेताचा पंचनामा करण्यासाठी तहसीलदारांकडे पत्रान्वये परवानगी मागितले आहे. पोलिसांनी तहसीलदारांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, कनीज फातेमा जावीद अख्तर शेख या बालिकेचा 23 रोजी संशयास्पदरित्या मृत्यू झाल्याची तक्रार 26 रोजी प्राप्त झाली. या बालिकेचा मृतदेह तिचे नातेवाईक जावीद अख्तर शेख जमालोद्दीन (हुडको), शेख साजीद अख्तर शेख जमालोद्दीन, फिरोज अख्तर शेख जमालोद्दीन (अमळनेर), निलोफर परवीन निसार खान (धुळे) यांनी इतरांना न कळविता परस्पर दफन केला. याबाबत बालिकेचे मामा अजहरअली शौकतअली यांनी पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी बालिकेच्या आई, वडिलांना अमळनेरातून चौकशीकामी ताब्यात घेतले. त्यांच्या सांगण्यात तफावत असल्याने संशय निर्माण झाला आहे. या बालिकेचा दफन केलेला मृतदेह बाहेर काठून पंचनामा करण्यासाठी परवानगी मिळावी, अशा आशयाचे पत्र सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक बिरारी यांनी तहसीलदारांना पाठविले आहे. याप्रकरणी तहसीलदारांच्या सूचनेनुसार बुधवारी पुढील कार्यवाही होईल, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.