पिंप्राळ्यातील तरुण कांताई बंधार्‍यातील पाण्यात बुडाला

जळगाव । गिरणा नदीवरील कांताई बंधारा परिसरात मित्रांसोबत फिरायला गेलेला पिंप्राळ्यातील एक तरुण रविवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास बुडाला. त्याचा शोध घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
पिंप्राळा परिसरातील आकाश चंद्रकांत पाटील (वय 21) रविवारी दुपारी मित्रांसह गिरणा नदीवरील मोहाडीजवळील कांताई बंधार्‍यावर फिरण्यासाठी गेला. सध्या पावसाळा सुरू झाल्याने बंधार्‍यात जलसाठा वाढत आहे. आकाश व त्याचे मित्र बंधार्‍यातील पाण्यात पोहण्यासाठी उतरले. मात्र, पाण्याच्या पातळीचा अंदाज न असल्याने आकाश पाण्यात बुडाला. बंधार्‍यातील वाढलेल्या जलसाठ्यात तरुणाचा शोध घेणे कठीण होत आहे. याबाबत कळताच तालुका पोलीस ठाण्याचे कर्मचारी सतीश हारनोळ, हरी पाटील, सुशील पाटील, प्रवीण हिवराळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पट्टीच्या पोहणार्‍यांना तत्काळ घटनास्थळी बोलविले. ते तरुणाचा शोध घेत आहे.