पिंप्राळ्यातील महिलेच्या खूनप्रकरणी आरोपीला 24 पर्यंत पोलिस कोठडी

0

धुळे- अनैतिक संबंधातून महिला शेती नावावर करण्यासाठी तगादा लावत असल्याच्या कारणातून जळगावातील पिंप्राळ्याच्या योगिता मोहन शिरसाठ (32, पिंप्राळा, जळगाव) या महिलेचा संशयीत आरोपी नितीन विश्‍वनाथ पाटील (34, पाळधी खुर्द, ता.धरणगाव, जि.जळगाव) याने सोमवारी रात्री खुन केला होता. आरोपीला अटक केल्यानंतर त्याच्याविरुद्ध धुळे शहर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला तर बुधवारी त्यास धुळे न्यायालयात हजर केले असता खुनातील चाकू जप्त करण्यासह तसेच खुनामागील उद्देश जाणून घेण्यासाठी पोलिस निरीक्षक गणेश चौधरी यांनी पोलिस कोठडीची मागणी केल्यानंतर न्यायालयाने त्यास 24 पर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

तगादा लावल्याने काढला काटा
मयत योगीता शिरसाठ याचे आरोपी नितीन पाटीलसोबत सुमारे पाच वर्षांपासून अनैतिक संबंध होते व दोन बिघे शेती नावावर करण्यासाठी संबंधित महिला तगादा लावत होती शिवाय आरोपीच्या घरीदेखील अनैतिक संबंधाची कुणकुण लागल्याने प्रपंचात कौटुंबिक कलह वाढल्याने आरोपीने महिलेचा काटा काढण्याचे ठरवत तिला लग्नाला जायचे सांगून धुळ्यात सोमवारी बोलावले होते. महिला पिंप्राळ्यातून तर आरोपी पाळधीहून धुळ्यात आले. दोन लॉजमध्ये गेल्यानंतर ओळखपत्र मागण्यात आले मात्र ते नसल्याने आरोपीने रीक्षा चालकाचा विश्‍वास संपादन करून त्याच्या ओळखपत्राची झेरॉक्स प्रत काढून ती आग्रा रोडवरील राजस्थानच्या लॉज चालकाला देत 101 क्रमांकाची खोली मिळवली. याचवेळी उभयंतांमध्ये खटके उडाल्याने आरोपीने सुरीने महिलेचा गळा चिरत तिचा खून केला व पळ काढला होता मात्र मयत महिलेच्या मोबाईलवरून आरोपीचा छडा लागल्यानंतर त्यास अटक करण्यात आली.