जळगाव । ’प्रतिपंढरपूर’ म्हणून ओळखल्या जाणार्या येथील पिंप्राळा नगरीतील रथोत्सवासाठीची जय्यत तयारी सुरू झाली आहे. येत्या 4 जुलैला आषाढी एकादशीदिनी रथोत्सव आहे. रथोत्सवासाठी विविध समित्यांच्या बैठका घेण्यात आल्या असून, त्यात रथोत्सव यशस्वितेसाठी काय काय करता येईल यावर विचार मंथन करण्यात आले आहे. दरम्यान, रथाच्या रंगरंगोटीचे काम देखील पूर्ण झाले असून रविवारी रथमार्गाची साफसफाई करण्यात आली आहे.
रथमार्गाची मनपा कर्मचार्यांकडून साफसफाई
वाणी समाज पंच मंडळ व ग्रामस्थांतर्फे पांडुरंगाचा रथ जानकाबाई की जय’च्या जयघोषात निघतो. रथोत्सवाचे यंदा 142 वे वर्ष आहे. गावकर्यांची बैठक घेऊन रथोत्सवात काय- काय नियोजन आहे? याची माहिती देण्यात आली आहे. त्यात दिंडी, पालखी कशी निघेल, कोणत्या मार्गाने निघेल? त्यात काय नवीन बाबी असतील याची रूपरेषा तयार करण्यात आली आहे. त्यातच पिंप्राळा परिसरात जोरदार तयारी सुरू असून रथमार्गाची डागडुजगी करून दुरूस्ती करण्यात आली आहे.
पिंप्राळा रथोत्सवाची तयारी पूर्णत्वाकडे आली असून रथाला धुण्यात आले. तसेची रथाची सजावट व रंगरंगोटी करण्यात आली आहे. पिंप्राळ्यातील नगरसेवकांकडून तसेच वाणी पंचमंडळ आणि मनपा अधिकार्यांकडून काही दिवसांपूर्वीच रथमार्गाची पाहणी झाल्यानंतर नादुरूस्त असलेल्या रस्त्यांवर महानगर पालिकेकडून दुरुस्ती करण्यात आली आहे. तसेच मोगर्या बनविण्याचे काम देखील पूर्ण झाले आहे. यातच रविवारी संपूर्ण रथमार्गाची मनपा कर्मचार्यांकडून साफसफाई करण्यात आली आहे. तर विविध ठिकाणी लाईटे लावण्यात आले असून मंदिरांवर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.