विद्युत मीटर बसविण्यासाठी तीन हजार रुपयांच्या लाचेची मागणी भोवली
जळगाव- नवीन विद्युत मीटर बसवून देण्यासाठी तीन हजारांच्या लाचेची मागणी करणार्या जळगावच्या पिंप्राळ्यातील वीज कंपनीच्या वरीष्ठ तंत्रज्ञ व सिनियर टेक्नीशीयन असलेल्या मयुर अशोक बिर्हाडे (31) यास जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास हरी विठ्ठल नगराजवळील तक्रारदाराच्या घराजवळच पकडल्याने वीज कंपनीच्या लाचखोर अधिकार्यांसह कर्मचार्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
तीन हजारांच्या लाचेची मागणी भोवली
जळगावच्या पिंप्राळ्यातील 61 वर्षीय वयोवृद्ध तक्रारदाराकडे नवीन विद्युत मीटर बसविण्यासाठी आरोपी मयूर बिर्हाडे याने तीन हजार रुपये लाचेची मागणी केली होती तक्रारदाराला लाच द्यावयाची नसल्याने त्याने एसीबीकडे तक्रार नोंदवली. गुरुवारी आरोपी हरी विठ्ठल नगरातील तक्रारदाराच्या घराजवळ लाच घेत असतानाच पथकाने त्यास पंचांसमक्ष सापळा रचून अटक करण्यात आली. ही कारवाई जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक जी.एम.ठाकुर, पोलिस निरीक्षक् निलेश लोधी, पोलिस नाईक मनोज जोशी, शामकांत पाटील, प्रशांत ठाकुर, प्रवीण पाटील, अरुण पाटील, नासीर देशमुख, ईश्वर धनगर आदींच्या पथकाने केली.
लाच मागितल्यास करा तक्रार
कोणताही शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तत्काळ जळगाव एसीबीच्या अल्पबचत भवनातील कार्यालयात तसेच दूरध्वनी क्रमांक 0257-2235477 तसेच मोबाईल 9607556556 व टोल फ्री क्रमांक 1064 वर संपर्क साधावा, असे आवाहन उपअधीक्षक गोपाळ ठाकूर यांनी केले आहे.