Murder of a three-month-old baby on Koytya Dhak: Incident in Chalisgaon Taluka चाळीसगाव : मध्यरात्रीच्या सुमारास घरात शिरत संशयीताने आधी बिर्याणी खाल्ली नंतर कोयत्याचा धाक दाखवून अवघ्या तीन महिन्यांच्या चिमुकलीचा खून केल्याची घटना चाळीसगाव तालुक्यातील पिंप्री प्र.दे. येथील इंदिरानगर भागात घडल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अरविंद कैलास पाटील (40) या संशयीताविरोधात मेहुणबारे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
कोयत्याच्या धाकावर बालिकेचा खून
चाळीसगाव तालुक्यातील पिंप्री प्र.दे. येथील 27 वर्षीय विवाहिता शोभना सोनू ठाकरे (27, कोळी) पती, मुलांसह वास्तव्यास असून पती सोनू ठाकरे हा मोजमजुरी करतो. मंगळवार, 11 ऑक्टोंबर रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास विवाहितेचे पतीशी घर खर्चाला पैसे देत नाही या कारणावरून भांडण झाल्यानंतर दोघे पती-पत्नी जेवण न करता झोपलेे. त्यानंतर बुधवार, 12 ऑक्टोंबर रोजी पहाटे दोन वाजेच्या सुमारास संशयीत अरविंद कैलास पाटील (40) हा कोयता घेवून घरात दाखल झाला. विवाहितेला त्याने कोयत्याचा धाक दाखवत गप्प बसण्यास सांगितले. नंतर घरातील पातेल्यातील बिर्याणी ताटात घेवून खाल्ली व नंतर विवाहितेवर कोयता उगारून खिशातील रूमालाने तीन वर्षीय बालिका गुंजन सोनु ठाकरे हिचे नाक व तोंड दाबल्याने बालिकेचा मृत्यू झाला.
पोलिसांची घटनास्थळी धाव
मध्यरात्री विवाहितेने पतीला घडल्या प्रकाराची माहिती दिल्यानंतर संशयीताचा पाठलाग करण्यात आला मात्र तो तत्पूर्वीच पसार झाला. मेहुणबारे पोलिसांना माहिती कळवल्यानंतर आयपीएस ऋषीकेश रावले यांच्यासह सहकार्यांनी धाव घेत पंचनामा केला. आयपीएस रावले म्हणाले की, महिलेच्या तक्रारीनुसार आम्ही खुनाचा गुन्हा दाखल केला असून संशयीताला अटक करण्यात आली आहे. घटनेच्या नेमक्या कारणांबाबत तपास सुरू असल्याचे ते म्हणाले.