11 हजारांचा मद्यसाठाही केला जप्त
भुसावळ:- तालुक्यातील पिंप्रीसेकम येथे सार्वजनिक जागी पत्त्याचा डाव रंगात आला असतानाच साध्या वेशातील पोलिसांनी धाड टाकत 12 जुगार्यांच्या मुसक्या आवळल्या. सोमवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. आरोपींच्या ताब्यातून 10 हजार 320 रुपयांच्या रोकडसह 30 हजार रुपये किंमतीची दुचाकी तसेच 17 हजार 500 रुपये किंमतीचे आठ मोबाईल मिळून 57 हजार 820 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जुगार अड्ड्याजवळच अशोक धनसिंग तायडे यांच्या घरातून 12 हजार 410 रुपये किंमतीची देशी दारू जप्त करण्यात आली. आरोपी मात्र पसार होण्यात यशस्वी झाला.
दोन स्वतंत्र गुन्हे ; 12 आरोपींना अटक
रात्री उशीरा तालुका पोलीस ठाण्यात जुगार खेळल्याप्रकरणी समाधान पाटील यांच्या फिर्यादीनुसार संशयीत ओरापी बापू जानकीराव बोरसे, गणेश सोपान सपकाळे, रूपेश अशोक सपकाळे, अजय जर्नादन चौधरी, कैलास किसन तायडे, प्रकाश दशरथ तायडे, विलास ज्ञानेश्वर तायडे, राहुल आनंदा सोनवणे (सर्व रा.पिंप्रीसेकम), ईम्रानखान दाऊदखान पठाण (दीपनगर), अवधूत क्षिरसागर इंगळे (पंधरा बंगला, भुसावळ), दिलीप दुर्गा गुमळकर (वरणगाव), किरण जगन कोळी (मोहाडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला तर बेकायदा दारूचा साठा बाळगल्याप्रकरणी राजेश काळे यांच्या फिर्यादीनुसार आरोपी अशोक धनसिंग तायडे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
यांचा कारवाईत सहभाग
सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक विशाल पाटील, कॉन्स्टेबल समाधान पाटील, भूषण चौधरी, राजेश काळे, हर्षल पाटील, अशोक मोरे, मदन देडवाल, विशाल पाटील, किरण मोरे, अझरूद्दीन शेख, ज्ञानेश्वर गीते, पवन कोंडे आदींनी ही कारवाई केली.