पिकअपची दुचाकीला धडक : सासर्‍याचा जागीच मृत्यू तर सून गंभीर जखमी

चाळीसगाव : दुचाकीवरून शेतात जाताना भरधाव पिकअपने दुचाकीस धडक दिल्याने झालेल्या अपघातात सासर्‍याचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकीवर मागे बसलेली सून गंभीर जखमी झाली. हा अपघात लांबे वडगाव शिवारात गुरूवारी सकाळी 9.30 वजाता घडला. शंकर रामचंद्र वाघ असे मृताचे नाव आहे. अपघातानंतर पिकअपचालक पसार झाला.

सासर्‍याचा जागीच मृत्यू
भोरस बुद्रूक येथील शंकर रामचंद्र वाघ हे त्यांची सून मीना तुलसीदास वाघ यांच्यासोबत, एमएटी दुचाकी (एम.एच.19, डब्ल्यू.3655) ने 14 रोजी सकाळी लांबे वडगाव शिवारातील शेताकडे जात होते. पाठिमागून त्यांचा मुलगा तुलसीदास हा साहित्य घेऊन दुसर्‍या दुचाकीने येत होता. वडगावपासून 500 मीटर अंतरावर मागून येणार्‍या पिकअपने वाघ यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यात शंकर वाघ व सून मीना वाघ हे रस्त्यावर पडले. धडक देणारी पिकअप शंकर वाघ यांच्या छातीवरून गेली. तर त्यांच्या हाताला व डोक्याला जबर मार लागला. अपघातानंतर बाजूच्या शेतकर्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली, तसेच दोघांना खासगी वाहनातून मेहुणबारे ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासून शंकर वाघ यांना मृत घोषीत केले. तर गंभीर जखमी मीना वाघ यांच्यावर चाळीसगावच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.