जळगाव। बारामती येथे विटभट्टीवर कामावर असलेले मजूरवर्ग पिकअप व्हॅनने चोपडा तालुक्यात असलेल्या घराकडे येत होते. दरम्यान, शिरसोली गावानजीकच्या आकाशवाणी टॉवरजवळ मजुरांच्या पिकअप व्हॅनला अज्ञात वाहनाने धडक दिली. यात पिकअप व्हॅन पलटी होवून त्यातील पाच मजूर गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
समोरासमोर वाहनांची धडक….
चोपडा तालुक्यातील कमळगाव येथील काही मजूरवर्ग हे बारामती येथील विटांच्या भट्टीवर कामाला आहेत. परंतू तेथील काम संपल्यामुळे काही मजूर बारामती येथून गावी कमळगावकडे पिकअप व्हॅनने परतत होते. परंतू शिरसोली गावाजवळून जात असतांना आकाशवाणी टॉवरजवळ त्यांच्या वाहनाला अज्ञात वाहनाने धडक दिली आणि त्यात पिकअप व्हॅन पलटी झाली. पिकअप व्हॅनमध्ये बसलेले छोटू तुकाराम मालचे (वय-30), रेखा बापू मालचे (वय-30), भाईदास देविदास सोनवणे (वय-32), नारायण बाबुराव कुंभार (वय-65), ओम गोरख कुंभार (वय-10) सर्व रा. कमळगाव हे जखमी झालेत. त्यांना नागरिकांच्या मदतीने वाहन उभे करून जखमींना लागलीच जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.