मुंबई : पिक विम्याची मुदत आज शेवटची तारीख असून मराठवाड्यात बँकांपुढे रांगा लागल्या आहेत हे खरे असल्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी परिषदेत मान्य केले. ही योजना केंद्राची असून केंद्राकडे मुदत वाढीचा प्रस्ताव पाठवला आहे. तीनदा केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला आहे. १५ ऑगस्टपर्यंत मुदत वाढीची मागणी केली आहे. मुदतवाढीसाठी केंद्रापुढे धरणे धरु परंतू शेतकऱ्यांना न्याय देणार आहोत असे त्यांनी विधानपरिषद सभागृहात स्पष्ट केले. संध्याकाळपर्यंत मुदतवाढ मिळाली नाही तर दिल्लीला जाऊ पण शेतकऱ्यांना न्याय देणार आहे असेही ते म्हणाले. विम्याचे निकष कायम राहतील, कंपन्या मुदतवाढीनंतर बदल करणार नाही, हे कंपन्यांना मान्य करावेच लागेल. कंपन्यांनी मान्य न केल्यास त्याला राज्य सरकार जबाबदारी घेईल असे त्यांनी स्पष्ट केले.
विधान परिषदेत निवेदन करताना ते बोलत होते. सभागृह कामकाजाला सुरवात होताच विरोधी पक्षाच्या वतीने नियम २८९ अन्वये स्थगन प्रस्तावा द्वारे चर्चेची मागणी केली. विभान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी चर्चेचा प्रस्ताव नाकारला. त्यावेळी निवेदन करताना कृषिमंत्री पांडूरंग फुंडकर यांनी माहिती दिली.
नांदेडमधे रांगेतल्या शेतकऱ्याला चक्कर आली. प्राथमिक उपचार केले होते. मात्र, नांदेड जिल्ह्यातील शेतकरी रामा पोतरे या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. त्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला ५ लाखाची मदत देण्यात येणार असल्याची घोषणा कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी केली. विरोधकांच्या माहितीनुसार मागील वर्षी जुलै अखेर १ कोटी ९ लाख शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता मात्र यंदा तो आकडा ६ लाखाच्या वरती जाऊ शकला नाही . यासाठी सरकारचे वेळकाढू धोरण आणि ऑफलाईन पद्धत न स्वीकारणे जबाबदार असल्याचा आरोप विरोधकांनी केला.