पिकांच्या मशागतीनंतर शेतकर्‍यांना लागली पावसाची प्रतीक्षा

0

यंदाच्या पावसाळ्यात तालुक्यात केवळ 187 मिलीमीटर पावसाची नोंद

भुसावळ- गत आठवडाभरापूर्वी असलेल्या रीपरीप पावसाने उसंत घेताच शेतकर्‍यांनी शेतातील पिकांच्या आंतर मशागतीच्या कामांना वेग देवून आटोपती घेतली मात्र गत दहा ते बारा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकर्‍यांना पावसाची प्रतीक्षा लागली असून त्यांच्यामध्ये चितेंचे सावट निर्माण झाले आहे तर यंदाच्या दोन महिन्याच्या कालावधीत तालुक्यात केवळ 187 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

पावसाची प्रतीक्षा कायम
यंदाच्या पावसाचे उशीरा आगमन झाल्याने खरीप पिकांची पेरणी उशीराने झाली. त्यातही पावसाने काही दिवस एक सारखी रीपरीप ठेवल्याने पिकांच्या आंतर मशागतीची कामे खोळंबली होती तसेच पावसाच्या रीपरीपमुळे पिकांचे नुकसान होण्याची भीती शेतकर्‍यांमध्ये निर्माण झाली होती मात्र पावसाने गत दहा ते बारा दिवसापासून पावसाने उसंत घेतल्याने शेतकर्‍यांनी लगबगीने खरीपाच्या पिकांच्या आंतर मशागतीचे कामे आटोपती घेतली. यामध्ये कोळपणी, निंदणी, रासायनिक खते आणि किटकनाशकांची फवारणी अशा कामांचा समावेश होता. यामुळे मजुरांनाही चांगल्यापैकी मजुरीची कामे मिळाली मात्र गत दहा ते बारा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकर्‍यांना पावसाची प्रतीक्षा लागली असून त्यांच्यामध्ये चिंतेचे सावट निर्माण झाले आहे.

दमदार पावसाची अपेक्षा
यंदा पावसाळ्याची सुरुवात रीपरीप पावसाने झाली असून तालुक्यात अद्यापही दमदार पाऊस झाला नाही. यामुळे भुगर्भातील पाण्याची पातळीही वाढली नसल्याने काही गावांमध्ये पाणीटंचाईची समस्या कायम आहे.तसेच शेत-शिवारातील विहिरींच्या पातळीतही वाढ झाली नाही. यामुळे सर्वांना दमदार पावसाची प्रतीक्षा लागली आहे.

तालुक्यात केवळ 187 मिमि पावसाची नोंद
महसूल विभागाच्या माध्यमातून तालुक्यातील पिंपळगाव, कुर्‍हे पानाचे, वरणगाव व भुसावळ अशा मंडळात दोन महिन्यांच्या कालावधीत केवळ 187 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे तर शेतकर्‍यांमध्ये निर्माण झालेले पिकांवरील कीड रोगाचे नियंत्रणासाठी कृषी विभागाचे एम.सी.गजरे व सहकारी शेतकर्‍यांना योग्य असे मार्गदर्शन करीत असल्याने शेतकर्‍यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

तापमानाचा पाराही 31 अंशावर
पावसाळ्याचे दिवस असूनही तालुक्यात तापमानाचा पारा 31 अंशावर पोहचला आहे. तालुक्यात 40 टक्केही पाऊस झाला नसल्याने अनेकांमध्ये चिंतेचे सावट निर्माण झाले आहे तसेच वातावरणातही उकाडा निर्माण झाला असून बदलत्या वातावरणाचा नागरीकांच्या आरोग्यावर विपरीत परीणाम होत असल्याचे दिसून येत आहे.