पिक विमापुर्तीसाठी शिवसेनेतर्फे कंपन्यांना १५ दिवसाचा अल्टीमेटम !

0

मुंबई: शिवसेनेतर्फे खासगी पिक विमा कंपन्यांविरोधात मोर्चा काढण्यात आला. वांद्रे-कुर्ला संकुल येथील ‘भारती अॅक्सा ‘ या खासगी विमा कंपनीच्या कार्यालयावर शिवसेनेने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर खासगी पीक विमा कंपन्यांविरोधात मुंबईत मोर्चा काढला. या मोर्चात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा नेते आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे नेते आणि पदाधिकारी या मोर्चात सहभागी झाले. राज्यातील खासगी विमा कंपन्यांना १५ दिवसांच्या आत प्रलंबित प्रकरणांना न्याय मिळवून द्यावाच लागेल, अशा इशारा उद्धव यांनी राज्यातील सर्वच खासगी विमा कंपन्यांना दिला आहे.

आगामी १५ दिवसांत कर्ज माफ झालेल्या शेतकऱ्यांची नावे बँकांच्या बोर्डावर झळकलीच पाहिजेत अशी सूचना उद्धव यांनी बँकांना केली. मोठमोठ्या लोकांनी बँकांची फसवणूक केली. या लोकांनी बँकांना चुना लावला, मात्र त्यांपैकी कुणीही आत्महत्या केली नाही याकडेही उद्धव यांनी लक्ष वेधले.

सरकारने विविध योजनांच्या घोषणा केल्या असतानाही त्यांचा लाभ झारीतले शुक्राचार्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू देत नाहीत असा शिवसेनेचा आरोप आहे. विजय मल्ल्या, मोदी, चोक्सी हजारो कोटींचा घोटाळा करून पळून जातात. पण शेतकऱ्यास त्याच्या हक्का मोबदला पीक विमा कंपन्या मिळू देत नाहीत. अशा मुजोर विमा कंपन्यांची कार्यालये मुंबईत आहेत. त्यांची मुजोरी मोडण्यासाठी हा मोर्चा असल्याचे शिवसेनेने म्हटले. दरम्यान शिवसेनेने पुकारलेल्या आंदोलनावर विरोधी पक्षांनी टीका केली आहे. पिक विमा कंपन्यांवर मोर्चा काढणे शिवसेनेचा स्टंट असल्याचे आरोप विरोधकांनी केले आहे.