बारामती । बारामती नगरपालिकेच्या पाणीपुरवठा करत असलेल्या टँकरमध्ये आळ्या सापडल्याने खळबळ उडाली आहे. कसबा रोडनजीकच्या जामदार रोड येथे दर सोमवारी, मंगळवारी बारामती नगरपालिकेच्या टँकरने पिण्याचे पाणी पुरविले जाते. जामदार रोड येथील रहिवाशांना टँकरमधून पाणी देत असताना पुष्पा कुतवळ यांना कळशीमध्ये आळ्या दिसल्या. त्यांनी ताबडतोब टँकरचालक नाना कांबळे यांना आळ्या दाखवून परिस्थितीचे गांभिर्य लक्षात आणून दिले. तसेच जामदार रोडवरील रहिवाशांनाही हे पाणी पिऊ नये असे आवाहन करण्यात आले.
जामदार रोड येथे मोरयानगर, ढवाणवस्ती भाग दिड हजार लोकसंख्येचा आहे. बारामती नगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी या भागातील रहिवासी विहिरीचे पाणी व कालव्याचे पाणी पिण्यासाठी वापरत होते. नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर या भागाला बारामती नगरपालिका टँकरव्दारे पिण्याचे पाणी पुरविते. आठ ते दहा घरातील कळशी व बादल्यांमधील पाण्यात आळ्या दिसून आल्या. आळ्या असलेले पाणी एका बाटलीत भरून टँकरचालकाच्या ताब्यात देण्यात आले. टँकर चालकाने नगरपालिकेच्या अधिकार्यांना दूरध्वनीवरून ही माहिती दिली. पाणी ज्या तलावातून भरण्यात येते तेथे नगरपालिकेचा फिल्टर टँक आहे. येथील अधिकार्यांनाही याची कल्पना देण्यात आली.
नागरिक संतप्त
पाण्यात आळ्या सापडल्यामुळे रहिवाश्यांमध्ये एकच खळबळ उडाली होती. कसबा येथील सामाजिक कार्यकर्ते नाना सातव हे कार्यकर्त्यांसह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी स्वत: या आळ्या पाहिल्या व संताप व्यक्त केला. नगरपालिकेचा गलथान कारभार आता नागरिकांच्या जीवावर उठला असून नगरपालिकेच्या पदाधिकार्यांना व प्रशासनास याचे गांभिर्य नसल्याचे स्पष्ट जाणवत आहे. ही अत्यंत दुर्दैवाची बाब असून नागरिक आता मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाहीत, असे मत नाना सातव यांनी व्यक्त केले.
दुसर्या टँकरमध्येही सापडल्या आळ्या
दरम्यान टँकरचालकाने दुसरा टँकर पाण्याने भरून आणला. या टँकरमध्येही आळ्या आढळून आल्या यावेळी विविध प्रसिी माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या सर्वांनी या आळ्या जवळून पाहिल्या. यावेळी वंदना रूपेश बनकर, पुष्पा कुतवळ, उज्वला शिंदे, अर्चना काटे, अनुराधा जाधव यांनी आपली कैफियतच पत्रकारांसमोर मांडली.
बेजबाबदार प्रशासन
घटनास्थळी नगरपालिकेचे लिपिक विजय शितोळे हजर होते. मात्र पाणीपुरवठा करणारे वरिष्ठ अधिकारी तसेच पदाधिकारी घटना घडूनही जवळपास दिड तास आले नव्हते. परिसरातील नागरिक घोळक्याने यावर चर्चा करत होते. भागातील नागरिकांना रस्ता व पाणी या मुलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागला. आजच्या या घटनेमुळे बारामती नगरपालिकेचे प्रशासन नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करत असल्याचे दिसून आले.