पोलादपूर । तालुक्यातील पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या कापडे ते कामथे रस्त्यावर रविवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगाने जाणार्या झायलो गाडीने महिंद्रा जीतो टेम्पोला जोरदार धडक देऊन केलेल्या अपघातामध्ये नऊ प्रवासी जखमी झाले.
यापैकी एका प्रवाशाला गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या आहेत. जखमींवर पितळवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये प्राथमिक उपचार करण्यात येऊन पोलादपूर आणि महाड येथील ग्रामीण रूग्णालयामध्ये पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले. अपघाताची खबर मिळताच पोलीस चालक एएसआय जंगम, पोलीस नाईक दीपक जाधव, गोविलकर, पिंगळे आदींनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करीत जखमींना पितळवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल केले. यावेळी उपनिरिक्षक चंद्रकांत सकपाळ यांनी अपघातस्थळी भेट दिली. याप्रकरणी पोलीस नाईक दीपक जाधव हे सहायक पोलीस निरिक्षक प्रकाश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास करीत आहेत.