जळगाव । लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करून युवतीची फसवणूक केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील संशयित पोलीस कॉन्स्टेबल तसेच पीएसआय या पिता पुत्राने दाखल केलेल्या जामीन अर्जावर शुक्रवारी निर्णय झाला नाही. हा निर्णय पुन्हा एक दिवस लांबणीवर गेला असून शनिवारी यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे. आपल्या फिर्यादीमध्ये न दिलेला मजकूर समाविष्ट करून अधिकार्यांनी संशयितांना वाचविण्याचा प्रयत्न केला, असा आरोप पीडित युवतीने जाहीरपणे केल्याने हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला. नशेचे पान खाऊ घालून अत्याचार केला, असा आपण न मांडलेला मुद्दा आपल्या फिर्यादीमध्ये आपल्याला काही एक न सांगता सहभागी करून घेण्यात आला, असा युवतीने थेट आरोप केला होता.या गुन्ह्यातील पोलीस कॉन्स्टेबल परवेज शेख तसेच पोलीस उपनिरीक्षक रईस शेख यांना न्यायालयाने तात्पुरता जामीन अर्ज दिला आहे. त्याची मुदत दि. 29 रोजी संपली. दरम्यान संशयिताना दिलेल्या जामिनावर पीडित मुलीने प्रतिज्ञापत्र सादर करून हरकत घेतली. मुळ फिर्यादी, बचाव पक्ष आणि सरकार पक्षाने या प्रकरणी युक्तीवादातून गुरूवारी बाजू मांडली. या अर्जावर शुक्रवारी निर्णय होणार होता. परंतु आजदेखील निर्णय होऊ शकला नाही. आता शनिवारी या अर्जावर निर्णय होणार असून कोर्टाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.