Farmer Father And Son Died Due to Lightning Strike in Navhe Shivar चाळीसगाव : चाळीसगाव तालुक्यातील न्हावे शिवारात शुक्रवारी पिकांना खते देण्यासाठी गेलेल्या पिता-पूत्रांच्या अंगावर अचानक वीज कोसळल्याने दोघांचा मृत्यू ओढवला तर महिला बचावल्या. ही धक्कादायक घटना शुक्रवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. आबा शिवाजी चव्हाण (45) व मुलगा दीपक आबा चव्हाण (14, रा.न्हावे, ता.चाळीसगाव) अशी मयतांची नावे आहेत.
झाडाखाली उभे राहताच कोसळली वीज
चाळीसगाव तालुक्यातील न्हावे गावातील आबा शिवाजी चव्हाण (45) हे पत्नी व मुलासह न्हावे शिवारातील आपल्या शेतजमिरनीवर खते देण्यासाठी शुक्रवारी सकाळीच गेले होते. दुपारी दोन वाजता अचानक वातावरणात बदल होताच विजांच्या गडगडाटासह पावसाला सुरूवात झाल्याने दाम्पत्यासह त्यांचा मुलगा झाडाच्या आडोशाला उभे राहिले मात्र त्याचवेळी वीज कोसळल्याने आबा चव्हाण आणि मुलगा दीपक आबा चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला तर महिला थोडक्यात बचावली.
नावे गावात शोककळा
या घटनेने चाळीसगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली. चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मयत शेतकर्याच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परीवार आहे. या घटनेमुळे न्हावे गावावर शोककळा पसरली.