भुसावळ- दोन दिवसांपासून पिता बेपत्ता झाल्याने हरवल्याबाबत शहर पोलिसात नोंद करण्यासाठी आलेल्या मुलाला पित्याचा अतिमद्य सेवनाने मृत्यू झाल्याची घटना कळाल्याने त्याने टाहो फोडला. शहरातील कंडारी प्लॉट भागातील रहिवासी व व्यवसायाने पेंटर असलेले संजय भागवत खंडेराव (52) यांना दारूचे व्यसन होते व 6 फेब्रुवारीपासून ते बेपत्ता असल्याने त्यांचा सर्वत्र शोध सुरू होता. शहरातील रेल्वे युनियन कार्यालयासमोर एका अनोळखीचा मृतदेह सापडला असल्याची माहिती काहींनी शुक्रवारी सकाळी पोलिस ठाण्यात देत असताना प्रणीत संजय खंडेराव हादेखील पिता बेपत्ता असल्याची खबर देण्यासाठी पोहोचला. पोलिसांनी या तरुणास मृतदेहाबाबत खातरजमा करण्याचे सांगितल्याने प्रणीत घटनास्थळी पोहोचल्यानंतर मयत हेच आपले पिता असल्याचे कळताच त्याने जागीच टाहो फोडला. या प्रकरणी प्रणीत संजय खंडेरावच्या खबरीनुसार शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयतास दारूचे व्यसन असल्याने अतिमद्यसेवनाने त्यांचा मृत्यू झाल्याचे खबरीत नमूद आहे.