पुणे : पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन आयोजित 17 व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील पिफ फोरम’, रेस्ट्रोस्पेटिव्ह’, ट्रिब्युट’, कंट्री फोकस’, विद्यार्थी स्पर्धात्मक विभाग’ या विभागांतील विशेष कार्यक्रम आणि चित्रपटांची घोषणा महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी पत्रकार परिषदेत केली. पिफमध्ये यंदा सात मराठी चित्रपटांची निवड झाली आहे.
चिली देशांतील ’डॅम किड्स’ हा गोन्जालो जस्टिनिऍनो दिग्दर्शित स्पॅनिश चित्रपट महोत्सवाच्या ओपनिंग फिल्ममध्ये आहे. यासह 10 ते 17 जानेवारी दरम्यान होणार्या विविध कार्यक्रमांची माहिती पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली. यावेळी महोत्सवाचे सचिव रवी गुप्ता, डॉ.मोहन आगाशे, सतीश आळेकर, अभिजित रणदिवे, सबिना संघवी, अ. भा. मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम आदी उपस्थित होते.
मराठी चित्रपटांचे यश
2018 हे वर्ष मराठी चित्रपटांसाठी खरोखर भरभराटीचे ठरले. यावर्षी चांगल्या मराठी चित्रपटांचा आस्वाद प्रेक्षकांना घेता आला, असे मेघराज राजेभोसले यांनी सांगितले. मुळशी पॅटर्न, नाळ, खटला बिताला, भोंगा, चुंबक, बोधी, दिठी या चित्रपटांनी महोत्सवाच्या मराठी चित्रपट स्पर्धात्मक विभागामध्ये बाजी मारल्याचे राजेभोसले यांनी सांगितले. यावेळी त्यांनी 2018 सालातील मराठी चित्रपटांचे यश या परिसंवादाची घोषणा केली.
17व्या महोत्सवाचे आकर्षण असणार्या विद्यार्थी विभागामध्ये’ यावर्षी विविध देशांतील 300 पेक्षा जास्त चित्रपटांतील 21 चित्रपट रसिकांना पाहाता येणार आहेत. त्याचबरोबर हंगेरी, अर्जेंटिना आणि तुर्की या देशांतील चित्रपटांची निवड पिफसाठी करण्यात आली आहे, अशी माहिती डॉ. जब्बार पटेल यांनी दिली. पिफ फोरम अंतर्गत कार्यक्रमांमध्ये होणार्या व्याख्याने, परिसंवाद आणि सादरीकरणांची माहिती पटेल यांनी दिली. गेल्या काही काळात निधन झालेल्या अभिनेत्री श्रीदेवी, दिग्दर्शिका कल्पना लाझमी आणि पटकथाकार शिनोबु हशीमोटो यांना अभिवादन करण्यासाठी त्यांचे गाजलेले चित्रपट ट्रिब्युट विभागांतर्गत दाखविण्यात येणार असल्याचे राष्ट्रीय चित्रपट संग्राहलयाचे संचालक प्रकाश मगदूम यांनी सांगितले.