पियाजो रिक्षा पलटल्याने युवक ठार

0

एरंडोल । येथील कासोदा-एरंडोल रस्त्यावर पियाजो रिक्षा उलटल्याने त्यातील एका युवकाचा मृत्यु झाला आहे. याबाबत एरंडोल पोलीस स्थानकातून मिळालेली माहिती अशी कि कासोदा येथून पियाजो क्र.(एमएच 19 एजी 8074) ने कासोदा येथील युवक तुषार कैलास खैरनार (वय-32) हा पुण्याला जाण्यासाठी एरंडोल येथे रात्री 8:45 वाजता यायला निघाला होता. परंतु वरील रिक्षा ही सोनबर्डी फाट्याच्या वळणावर आली असता रिक्षाचालकाला वळणाचा अंदाज न आल्याने ती जागेवरच उलटली. त्यात एकुण पाच प्रवाशी होते. त्यातील तुषारच्या याला डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्यास एरंडोल येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डाॅक्टरांनी मृत घोषित केले.

तुषार हा पुण्यातील खाजगी कंपनीत नोकरीस होता. कंपनीच्या कामानिमित्त तो 4 नोव्हेंबर रोजी चोपडा येथे आला होता. त्यामुळे तो आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी कासोद्यात आला होता. परतीच्या प्रवास दरम्यान काळाने तुषारवर हा घाला घातला. तुषारच्या घराची परिस्थिती हलाखीची असुन आई-वडील शेतीकाम करतात तर मोठा भाऊ कासोदा येथे शिवणकाम करतो.तुषारच्या अशा अपघाती अवेळी जाण्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. कासोदा रस्ता हा चाळीसगाव -येवला-भडगाव राज्य महामार्ग असुन त्या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झालेली आहे.गेल्या सहा महिन्यात अपघात स्थळी तिन ते चार मोठे अपघात होऊन अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच बर्‍याचदा किरकोळ अपघात होत असतात. सदर वळणावर जुना धारागीर रस्ता असल्याने वळणावरती कुठल्याच प्रकारचा दिशा दर्शक फलक नसल्याने चालकांना वळणाचा अंदाज येत नाही.