पिस्तुल बाळगणार्‍यास केली अटक

0

भोसरी – पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाशिक फाट्याजवळ एका तरुणाला बेकायदेशीर पिस्तुल बाळगल्या प्रकरणी अटक केली आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 9) सायंकाळी पाचच्या सुमारास करण्यात आली. ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणाकडून देशी बनावटीचे पिस्तुल आणि एक जिवंत काडतुस जप्त करण्यात आले आहे. रामभजन चानू रईकवार (वय 25, रा. नवी पेठ) असे पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सोमवारी दुपारी भोसरी पोलिसांना एक तरुण नाशिक फाट्याजवळ येणार आहे. त्याच्याजवळ बेकायदेशीर पिस्तुल असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथक तैनात करून व सापळा रचून रामभजन याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे हे पिस्तुल आले कसे, पिस्तुल घेऊन नाशिक फाट्याजवळ येण्याचे कारण, याबाबत भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

शैक्षणिक साहित्याचे वाटप
सांगवी – टाटा मोटर्स क्वालिटी ग्रुपतर्फे कै. सौ. शकुंतलाबाई आनंदराव शितोळे शाळेमधील 41 गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या साहित्यात एक स्कूल बॅग, एक डझन वह्या, कम्पास पेटी, रायटिंग पॅड यांचा समावेश आहे. यावेळी टाटा मोटर्स क्वालिटी ग्रुपचे आशिष कदम म्हणाले की, या ग्रुपमधील प्रत्येक अधिकारी व कर्मचारी मनापासून काम करतात. त्यामुळेच समाजातील वंचित घटकांसाठी आम्ही योगदान देऊ शकतो. ठरविलेले उद्दिष्ट वेळेत पूर्ण करतो. विद्यार्थ्यांनीदेखील चिकाटी व मेहनतीने अभ्यास करून चांगले गुण मिळवावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी उपस्थितांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमाला टाटा मोटर्सचे अधिकरी संजय विडेकर, धनराज जाधव, राजेंद्र महाळगी, दीपक जोशी, संतोष बल्लाळ, आशुतोष देशमुख, निलेश पिराजे, सोमनाथ कोरे, अजित निकम , गोपाळ बिरारी, परशुराम मालुसरे, संभाजी मोरे व सर्व कर्मचारी उपस्थित होते.