फैजपूर। पीपल्स रिपब्लिकन पार्टी पक्षातर्फे विविध मागण्यांसाठी छत्री चौकात मंगळवार 1 रोजी रास्ता रोको करण्यात आले. या रास्ता रोकोचे नेतृत्व पीआरपीचे जिल्हाध्यक्ष जगन सोनवणे यांनी केले. यावेळी निवेदन फैजपूर पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी स्विकारले. या निवेदनात फैजपूर येथील धाडी नदीच्या सुशोभीकरण व आठवडे बाजारात ओटे हे निकृष्ट दर्जाचे झाले असून त्याची चौकशी करुन संबधीतावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे.
निवृत्त पोलीस कर्मचार्यांस अटक करण्याची मागणी
तसेच गेल्या काही दिवसापूर्वी जैन मंदिर स्लॅब कोसळले यांची सुद्धा चौकशी करावी व शहरातील व अकलुद येथील गरिबांना घरकुल मिळालेच पाहिजे. तसेच म्हैसवाडी येथे गावात दहशत निर्माण करून मनोज प्रल्हाद पांडव यांच्यावर हल्ला करणार्या यांच्यावर 307 कलम प्रमाणे गुन्हा दाखल करावा व शेती हडप करणार्या निवृत्त पोलीस हवालदार पांडव यांना अटक करण्यात यावे असे आशयाचे निवेदन यावेळी देण्यात आले.
आंदोलनात यांचा होता सहभाग
या रास्ता रोको प्रसंगी पीआरपी जिल्हाध्यक्ष जगन सोनवणे, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष शेख आरिफ, गोपी साळी, अजय कोळी, दीपक रणशिंगे, सुधीर जोहरे, पीआरपी शहराध्यक्ष इम्रान शेख, शकील शेख, अनिल पांडव, संजय पांडव, योगेश पांडव यांच्या सह पक्षाचे असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
प्रशासनास दिले निवेदन
शहरातील धाडी नदीपात्राचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. तसेच आठवडे बाजारात ओट्यांचे बांधकाम करण्यात आले असून हे निकृष्ट दर्जाचे झाले आहे. या विरोधात आंदोलनादरम्यान घोषणाबाजी करण्यात आली. तसेच या कामांची चौकशी करुन संबधीतावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन प्रशासनास देण्यात आले आहे. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, हेडकॉन्स्टेबल इकबाल सैय्यद यांनी चोख बंदोबस्त ठेवला.