पीएचडीधारकांना दिलासा

0

पुणे । राज्यातील विद्यापीठ आणि कॉलेज प्राध्यापकपदाच्या नियुक्तीसाठी आता विद्यापीठ अनुदान आयोगाची (यूजीसी) मान्यता असणार्‍या विद्यापीठाने प्रदान केलेली पीएच.डी ग्राह्य धरावी लागेल. मुंबई उच्च न्यायालयाने याबाबतचा आदेश नुकताच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला दिला आहे. या निर्णयामुळे देशातील विविध विद्यापीठांमधून पीएचडी पदवी घेतलेल्यांना दिलासा मिळणार आहे.

विद्यापीठाच्या आखत्यारित येणार्‍या खासगी कॉलेजमध्ये एका व्यक्तीची सहयोगी प्राध्यापक म्हणून सुमारे चार वर्षांपूर्वी नियुक्ती शैक्षणिक संस्थेच्या निवड समितीद्वारे करण्यात आली. त्यानंतर समितीने संबंधित प्राध्यापकाला प्रशासनाची आणि इतर मान्यता मिळण्यासाठी त्यांचा अर्ज विद्यापीठाकडे पाठविण्यात आला.

संबंधित प्राध्यापकाने यूजीसीची मान्यता असणार्‍या खासगी विद्यापीठातून 2009मध्ये पीएचडीबाबत असणार्‍या नियमांची पूर्तता केली होती. विद्यापीठाकडे प्राध्यापकाचा अर्ज आल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने पीएचडीबाबत शंका उपस्थित केल्या आणि प्राध्यापकाला मान्यता देण्यापासून थांबविले. तसेच, विद्यापीठाने याबाबत यूजीसीसोबत पत्रव्यवहार केला. या प्रकारात प्राध्यापकाला नाहक त्रास सहन करावा लागला. त्यामुळे प्राध्यापकाने याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली होती.