ईडीकडून मोदींच्या मुंबई, सूरत, दिल्लीतील कार्यालयांवर छापे
मुंबई : पंजाब नॅशनल बँकेत (पीएनबी) तब्बल 11,300 कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा करणारा गुजरातचा उद्योगपती नीरव मोदी हा विदेशात फरार झाला असून, तो स्वित्झर्लंडमध्ये असल्याची माहिती एका वृत्तवाहिनीने दिली आहे. तर, मोदी हा देश सोडून गेल्याची कुठलीही माहिती नाही, असेही केंद्रीय गृहमंत्रालयाने सांगितले. मोदीसह आणखी तिघेजण फरार झाले असून, हा विजय मल्ल्या याच्यापेक्षाही मोठा घोटाळा ठरला आहे. या घोटाळ्यानंतर पीएनबीचे व्यवस्थापकीय संचालक सुनील मेहता यांनी गुरुवारी तातडीची बैठक घेतली. हा गैरव्यवहार बँकेनेच उघडकीस आणला असून, ग्राहकांचा पैसा सुरक्षित असल्याचे ते म्हणाले. या प्रकरणाची माहिती आम्ही सीबीआय, सेबी आणि इतर सर्व सरकारी एजन्सीजना दिली आहे. तसेच, बँकेच्या 10 अधिकार्यांना तडकाफडकी निलंबित केले आहे, असेही मेहता यांनी सांगितले. दरम्यान, सक्तवसुली संचलनालयाने मोदी याच्या मुंबईतील कुर्ला वेस्ट, कालाघोडा, बांद्रा, लोअर परेल, सूरत, दिल्ली येथील कार्यालयावर छापे घातले व काही महत्वाचे दस्तावेज ताब्यात घेतले आहेत. मोदीविरुद्ध लूकआउट नोटीसही जारी करण्यात आली होती. दरम्यान, मोदी याने पीएनबी बँकेला पत्र लिहून पैसे परत करण्यासाठी सहा महिन्यांचा वेळ मागितला असल्याचेही वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. या घोटाळ्यामुळे शेअर बाजारात बँकेचे शेअर 10 टक्क्याने घसरले होते.