नवी दिल्ली : नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांनी पीएनबीला 12 हजार कोटींचा गंडा घालून भारताबाहेर पसार झाले आहेत. याच मुद्यावरून लोकसभेत आणि राज्यसभेत विरोधकांचा गदारोळ पहायला मिळाला. विरोधकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या गोंधळामुळे राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावे लागले. नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांनी केलेला हजारो कोटींचा घोटाळा केंद्र सरकारला ठाऊक होता, असा आरोप विरोधकांनी याआधीच केला होता.
तसेच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही नोटाबंदीचा निर्णय नीरव मोदी आणि मेहुल चोक्सीला कर्ज मिळण्यासाठी घेण्यात आला, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. या प्रकरणी सीबीआय आणि ईडी यांची कारवाई सुरू आहे. नीरव मोदीने पंजाब नॅशनल बँकेच्या काही अधिकार्यांना लाच देऊन लेटर ऑफ अंडरटेकिंग्ज मिळाले. त्यानंतर याच माध्यमातून पीएनबीचे हजारो कोटी लुटून पसार झाला, असे उत्तर देण्याचा प्रयत्न सरकारने केला.