पीएफ न भरणार्‍या संस्थांची चौकशी होणार

0

पिंपरी-चिंचवड : शहरातील क्षेत्रिय हद्दीतील रस्ते, गटार यांची ठेकेदारी पद्धतीने दैनंदिन साफसफाई करणार्‍या स्वयंरोजगार संस्थांनी त्यांच्या कामगारांची भविष्य निर्वाह निधीची (पीएफ) रक्कमच भरली नसल्याचे समोर आले आहे. असा प्रकार करणार्‍या संस्थांची चौकशी एका निवृत्त अधिकार्‍यामार्फत करण्याचा निर्णय महापालिकेच्या स्थायी समितीने घेतला आहे. या कामासाठी संबंधित निवृत्त अधिकार्‍याला दीड लाख रुपये मेहनताना देण्यात येणार आहे.

महापालिकाच माहिती देत नाही
महापालिकेला सफाई कर्मचारी पुरविणार्‍या वेगवेगळ्या 68 संस्था कर्मचार्‍यांचा पीएफ, ईएसआय निधी जमा करत नाहीत. अशा संस्थांवर कारवाई करण्याची घोषणा स्थायी समितीने केली आहे. मात्र, संस्थांची माहिती महापालिका प्रशासनाकडून दिलीच जात नसल्याचे समोर आले. त्यामुळे अखेर स्थायी समितीने या 68 ठेकेदारी संस्थांसह इतर विभागांसाठी कंत्राटी कर्मचारी पुरविणार्‍या सर्व ठेकेदारांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

महिनाभरात अहवाल येणार
मे. त्रिमूर्ती कन्सल्टन्सी या एका निवृत्त पीएफ अधिकार्‍याच्या संस्थेची कामासाठी नेमणूक केली आहे. त्यांच्यामार्फत आगामी महिनाभरात महापालिकेतील सर्व विभागांच्या ठेकेदारी संस्थांची तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांना दीड लाख रुपये मेहनताना देण्यात येणार आहेत. ही संस्था एका महिन्यात आपल्याला तपासणी करून अहवाल देणार आहे, असे स्थायी समिती अध्यक्षा सावळे यांनी सांगितले.