पुणे । भविष्य निर्वाह निधीच्या पुणे कार्यालयाने वारंवार नोटीसा पाठवून देखील खात्यात पी.एफ न भरल्यामुळे जिल्ह्यातील 872 कंपन्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. कर्मचार्यां च्या पगारातून पी. एफ.च्या रकमेची कपात करून ती कर्मचार्यांच्या खात्यात जमा न केल्यामुळे कारवाई करण्यात येणार आहे. थकबाकीदार कंपन्यांच्या विरोधात 1 ते 31 मार्च या एक महिन्याच्या कालावधीत विशेष वसुली मोहीम राबविण्यात येणार आहे.
45 थकबाकीदार कंपन्यांना नोटिसा
जिल्ह्यातील 872 कंपन्यांनी मागील काही महिन्यापासून कर्मचार्यांचा पी. एफ. भरला नसल्याचे उघडकीस आले आहे. या कंपन्यांपैकी सुमारे 434 कंपन्यांकडे मोठ्या प्रमाणावर थकबाकी आहे. जिल्ह्यातील अनेक आयटी कंपन्या, औद्योगिक कंपन्या, शैक्षणिक संस्था आणि रुग्णालयांचा यामध्ये समावेश आहे.विभागीय पी. एफ. आयुक्त अरुण कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पथके स्थापन करण्यात आली आहेत. त्यामध्ये वसुली अधिकारी, विभाग निरीक्षक आणि वसुली निरीक्षकांचा समावेश आहे. मोहिमेच्या पूर्वतयारीसाठी आतापर्यंत 45 थकबाकीदार कंपन्यांना नोटिसा बजावण्यात आल्या असून, फेब्रुवारीअखेरीस हा आकडा दीडशेच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.
व्याज आणि दंडासह वसूली होणार
कंपन्यांनी थकीत असलेली रक्कम, त्यावरील व्याज व दंड लागलीच भरावे, हे कार्यालयाचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे थकबाकीदार कंपन्यांना नोटिसा बजावण्याची प्राथमिक कार्यवाही करण्यात आली आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करणार्या कंपन्यांवर कोणताही दुजाभाव न करता कारवाई होणार आहे. त्यासाठी विशेष वसुली मोहीम राबवून, पी. एफ.ची थकीत रक्कम व्याज आणि दंडासह वसूल करण्यात येणार आहे, अशी माहिती वसुली विभागाचे सहायक आयुक्त अतुल कोतकर यांनी दिली.