पुणे । भविष्य निर्वाह निधीची (पीएफ) थकीत रक्कम भरण्यास टाळाटाळ करणार्या कंपन्यांवर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) पुणे विभागीय कार्यालयाने कारवाई सुरू केली आहे. वर्षभरातील कारवाई आणि विशेष वसुली मोहिमेतून 57 टक्के थकबाकी वसूल करण्यात विभागाला यश आले आहे. मोहिमेदरम्यान आतापर्यंत 13 कोटी 87 लाख रुपये पीएफ थकबाकी वसूल करण्यात आली आहे. दहा कंपन्यांवर मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात आली.
अनेक कंपन्या कर्मचार्यांच्या पगारातून पीएफ कापून घेतात. मात्र, ती रक्कम कर्मचार्याच्या खात्यात भरत नाहीत. ही थकीत रक्कम कंपन्यांनी विनाविलंब भरावी, यासाठी ईपीएफओ कार्यरत आहे. पीएफ वेळेवर न भरणार्या कंपन्यांवर कारवाईचे अधिकारही ईपीएफओ कार्यालयाकडे आहेत, अशी माहिती ईपीएफओच्या पुणे विभागीय कार्यालयाकडून देण्यात आली आहे. गेल्या आर्थिक वर्षांच्या प्रारंभी पुणे विभागातील तब्बल 2400 कंपन्यांकडे 22 कोटी 67 लाख रुपये थकबाकी होती. वर्षभर या कंपन्यांकडील पीएफ थकबाकी वसूल करण्याचे काम विभागाकडून सुरू होते.
ताबा घेण्याची कार्यवाही करणार
थकबाकी भरण्यास टाळाटाळ करणार्या दहा कंपन्यांच्या मालमत्ता जप्त केल्या आहेत. यातील काही प्रकरणे न्यायप्रविष्ट असून लवकरच थकबाकीदार कंपन्यांचा ताबा घेण्याची कार्यवाही पूर्ण केली जाणार आहे, अशी माहिती पुणे कार्यालयाच्या वसुली विभागाचे सहायक पीएफ आयुक्त अतुल कोतकर यांनी दिली. पीएफ हा कर्मचार्यांच्या सामाजिक सुरक्षेचा प्रमुख घटक आहे. मात्र, विभागातील अनेक प्रतिष्ठित कंपन्या पीएफची थकीत रक्कम भरण्यास टाळाटाळ करत असल्याचे निदर्शनास आले आहे.
थकीत रकमेवर व्याज व दंड
ईपीएफओच्या नव्या नियमानुसार थकबाकीदार कंपन्यांचे ए, बी, सी असे वर्गीकरण करण्यात आले आहे. त्यामध्ये अनुक्रमे एक महिना, तीन महिने व सहा महिने थकबाकी ठेवणार्या कंपन्यांचा समावेश करण्यात आला आहे. या कंपन्यांकडून थकबाकी वसूल करण्याबाबत पीएफ कार्यालयाकडून कार्यवाही सुरू आहे. पीएफ न भरणार्या कंपन्यांना थकीत रकमेवर व्याज व दंड आकारला जात आहे. या पाश्वभूमीवर कंपन्यांनी कर्मचार्यांचा पीएफ नियमितपणे भरावा, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा सहायक पीएफ आयुक्त अतुल कोतकर यांनी दिला.