पुणे । पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (पीएमआरडीए) विकास आराखडा (डीपी) तयार करण्याचे काम सुरू आहे. पीएमआरडीएचा विकास आराखडा एक वर्षात पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती प्राधिकरणाचे आयुक्त किरण गित्ते यांनी दिली आहे.देशातील 21 प्रादेशिक प्राधिकरणामध्ये दिल्ली आणि बंगळूर पाठोपाठ पुणे महानगरची सर्वात मोठी हद्द आहे. पीएमआरडीएची 7,356 चौ. कि. मी हद्द आहे. प्रधिकरणाचा विकास आराखडा तयार करण्यापूर्वी विद्यमान जमीन वापर नकाशा (ईएलयू) तयार करण्यात आला आहे. या जमीन वापर नकाशांची तपासणी जमाबंदी आयुक्त कार्यालयातील वरिष्ठ अधिकार्यांकडून करण्यात येत आहे.
उच्च तंत्रज्ञानाचा वापर
प्राधिकरणाचा विकास आराखडा तयार करण्याकरिता ईएलयू तयार केला आहे. हे काम करताना प्राधिकरणाने उच्च तंत्रज्ञानाचा वापर केला असून यामध्ये 10 सें. मी. रिझोल्युशनपर्यंत अचूकता असलेले हवाई छायाचित्रण करण्यात आले आहे. प्राधिकरणामधील महसूल अभिलेख डिजीटल फॉर्ममध्ये तयार करण्यात आला आहे. प्राधिकरणाने उच्च तंत्रज्ञानाचा वापर केला असल्यामुळे साधारणपणे एक वर्षाच्या कालावधीत प्राधिकरणाचा विकास आराखडा पूर्ण करण्यात येणार आहे.