किरण गित्ते यांची माहिती : मार्गाला लवकरच मंजुरी
पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (पीएमआरडीए) मेट्रो हिंजवडी ते फुरसुंगीपर्यंत धावणार आहे. यासाठीचा सविस्तर प्रकल्प दिल्ली मेट्रोने तयार केला आहे. डिसेंबरमध्ये होणार्या प्राधिकरणाच्या बैठकीत शिवाजीनगर ते फुरसुंगी असा 12 किलो मीटरच्या मेट्रो मार्गाला मंजुरी मिळेल, अशी माहिती प्राधिकरणाचे आयुक्त किरण गित्ते यांनी दिली. पीएमआरडीएने हिंजवडी ते शिवाजीनगर असा मेट्रो प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम जानेवारी 2019 मध्ये सुरू करण्यात येणार आहे. दरम्यान, शिवाजीनगरपासून ही मेट्रो हडपसर येथे नेण्याची मागणी होत होती. तसेच प्राधिकरणानेही शहरभर मेट्रोचे जाळे विणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार हडपसर भागातही लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर आहे. या भागातून अनेक नागरिक नोकरीनिमित्त शहराच्या मध्यवर्ती भाग तसेच हिंजवडीपर्यंत प्रवास करतात. त्यामुळे हिंजवडी-शिवाजीनगर-हडपसर-फुरसुंगीपर्यंत असा मेट्रो मार्ग करण्याचा निर्णय घेतला.
प्राधिकरणाच्या बैठकीत होणार निर्णय
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हडपसरपर्यंत मेट्रो नेणार असल्याचे नुकतेच जाहीर केले. त्यामुळे हिंजवडी ते फुरसुंगीपर्यंत मेट्रोच्या मार्गावर शिक्कामोर्तब झाले आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर असा 23 किलोमीटरचा मेट्रो मार्ग आहे. ही मेट्रो शिवाजीनगर येथे महामेट्रोला जोडली जाणार आहे. शिवाजीनगर ते हडपसर असा मेट्रो मार्ग करत आहे. या मार्गावर सुमारे 11 स्टेशन असणार आहेत. यासाठीचा प्रकल्प अहवाल तयार होत आला आहे. डिसेंबरमध्ये होणार्या प्राधिकरणाच्या बैठकीत या मेट्रो मार्गाला मंजुरी मिळेल. या मार्गावरून 57 मेट्रोच्या कार धावणार असल्याची माहिती प्राधिकरणाचे आयुक्त गित्ते यांनी दिली.
शिवाजीनगर ते फुरसुंगी मार्ग
शिवाजीनगर (कोर्ट) – रेल्वे कॉलनी – एमजी रोड – फॅशन स्ट्रीट – मंमादेवी चौक – रेसकोर्स – काळूबाई चौक – वैदूवाडी – हडपसर फाटा – हडपसर बस डेपो – ग्लाईडींग सेंटर
– फुरसुंगी आयटी पार्क – सुलभ गार्डन.