‘पीएमआरडीए’च्या बीआरटी संदर्भात विजय पाटील यांनी घेतली आयुक्तांची भेट

0

पिंपरी-चिंचवड-पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) भविष्यात १४८ कि.मी. क्षेत्रात आठ मार्गांचे बीआरटीचे जाळे उभारणार आहे. ह्या आठ रस्त्यांमध्ये चार क्रमांकावर सद्यस्थितीत पिंपरी चिंचवड शहरातील वादग्रस्त असलेला “एचसीएमटीआर रिंग रोड” आहे. ह्या प्रस्तावित रिंग रोडमुळे गुरुद्वारा परिसर, बिजलीनगर, वाल्हेकरवाडी, चिंचवडेनगर, थेरगाव, रहाटणी, पिंपळे गुरव, कासारवाडी ह्या उपनगरातील ३५०० पेक्षा जास्त घरे बाधित होत आहेत. ह्या घरांकरिता तसेच ६५००० अनधिकृत घरांच्या नियमितीकरण प्रश्नांकरिता प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती सोसायटी- महाराष्ट्र राज्य अध्यक्ष व घर बचाव संघर्ष समितीचे मुख्य समन्वयक विजय पाटील यांनी पीएमआरडीए आयुक्त किरण गित्ते यांची प्राधिकरण येथील मुख्य कार्यालयात भेट घेत निवेदन दिले.

पिंपरी चिंचवड शहरातील १९८५ पासूनचा प्रस्तावित एचसीएमटीआर रिंग रस्ता हा कालबाह्य झालेला आहे. समितीचा विरोध विकासाला नाही. प्राधिकरण हद्दीतून तसेच पालिका हद्दीतून जाणाऱ्या या ७ किमी च्या जागेत सद्यस्थितीत दाट रहिवाशी घरे उभी आहेत.ह्या घरांना धक्का न लावता सदरचा ३१.४० किमी चा रस्ता बनविला जाऊ शकतो. महाराष्ट्र नगररचना अधिनियम १९६६ मधील कलम ३७ नुसार गौण फेरफार करून तसेच विकास आराखडायाचे पुनः सर्वेक्षण करून सदरचा प्रकल्प मार्गी लागू शकतो असे विजय पाटील यांनी पत्रकाद्वारे सांगितले.